जिंतूर : जांब गणातील १३ गावांना पाणीटंचाईच्या झळा; टँकर सुरू करण्याची मागणी



महिलांच्या पाणीप्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष? दोन आठवड्यांत प्रश्न न सुटल्यास पंस सदस्या सुनिता मस्के यांच्या घरावर घागर मोर्चा

लोकनेता न्यूज नेटवर्क

जिंतूर / रत्नदीप शेजावळे :- जिंतूर तालुक्यातील जांब पंचायत समिती गणातील जोगवाडा, सोस, सोनापूर तांडा, मानकेश्वर, राजेगाव, भांबरी, पांढरंगळा, हलविरा, जांब (बु.), रायखेडा, बेलखेडा, मानमोडी यासह परिसरातील गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पावसाअभावी विहिरी, बोअरवेल व अन्य जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

   दुष्काळसदृश परिस्थितीमुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी दूरवर जावे लागत असून, त्यांच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन पाणीटंचाईची स्थिती तपासावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायती व महसूल प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करून नियमित टँकर सुरू करावेत. तसेच टँकरचे वेळापत्रक निश्चित करून सर्व वाड्या-वस्त्यांना समान व पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

   दरम्यान, या पाणीटंचाईच्या प्रश्नावरून स्थानिक महिला लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चारठाणा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सरस्वती जाधव आणि जांब पंचायत समिती गणाच्या सदस्या सुनिता मस्के या दोघीही महिला लोकप्रतिनिधी आहेत. निवडणुकीच्या काळात महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासकामे करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सध्या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागत असलेली धावपळ पाहता या प्रश्नावर अपेक्षित पाठपुरावा झालेला नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दोन आठवड्यांचा अल्टिमेटम; घागर मोर्चाचा इशारा

   जांब गणातील गावांचा पाणीप्रश्न येत्या दोन आठवड्यांत मार्गी न लागल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेकडो महिलांना सोबत घेऊन पंचायत समिती गणाच्या सदस्या सुनिता मस्के यांच्या घरावर घागर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला जाणार असल्याचा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन या मागणीची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि प्रत्यक्ष टँकर सुरू करण्यासाठी किती तत्परतेने पावले उचलते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या निवेदनावर भास्कर सूर्यवंशी, सतीश वाकळे, मधुकर बनकर आणि शिवाजी वाकळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
________________________

0/Post a Comment/Comments