लोहारा तालुक्यावर रेल्वेबाबत अन्याय का? लोकप्रतिनिधी कुठे कमी पडले?


लोहारा तालुका रेल्वे संघर्ष समिती स्थापन करण्याची जोरदार मागणी

लोकनेता न्यूज नेटवर्क

लोहारा / असलम खानापुरे :- लोहारा तालुक्याचा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि शेतीसोबतच व्यवसायाचा होत असलेला विस्तार पाहता, परिसराच्या दळणवळणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. तालुक्यातील नागरिकांना प्रवासासाठी आणि शेतमाल तसेच उत्पादित माल बाजारात पोहोचवण्यासाठी आजही रस्ते मार्गावरच पूर्णपणे अवलंबून राहावे लागते.
या पार्श्वभूमीवर, लोहारा तालुक्याच्या दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग सुरू करणे काळाची गरज बनले आहे. या महत्त्वाकांक्षी मागणीला अधिकृत आणि संघटित स्वरूप देण्यासाठी आता *'लोहारा तालुका रेल्वे संघर्ष समिती'* ची स्थापना करणे अत्यंत आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार

गेल्या काही वर्षांत लोहारा तालुक्यात आर्थिक व व्यापारी हालचाली वाढल्या आहेत, परंतु वाहतुकीच्या अपुऱ्या साधनांमुळे अपेक्षित औद्योगिक व व्यावसायिक प्रगती साधता आलेली नाही. विशेषतः परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या प्रमुख बाजारपेठांपर्यंत कमी खर्चात आणि वेळेत पोहोचवण्यासाठी रेल्वे मार्गाची मोठी मदत होऊ शकते.
रेल्वे मार्ग सुरू झाल्यास वाहतूक खर्च कमी होईल, दळणवळण सुलभ होईल आणि तालुक्यातील उद्योग, व्यापार व रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मोठी मदत मिळेल.

औसा-उमरगाला रेल्वे, लोहारा वंचितच का?

अत्यंत संतापजनक बाब म्हणजे बाजूला असलेल्या औसा आणि उमरगा तालुक्यात रेल्वे मार्ग किंवा त्याचे सर्वेक्षण मंजूर झाले असताना, नेमका लोहारा तालुकाच रेल्वे सुविधांपासून वंचित का राहिला, असा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण होत आहे.
इतर लगतच्या तालुक्यांचा विकास होत असताना लोहारा तालुक्याकडे कायमच दुर्लक्ष केले गेले आहे. या प्रकरणी आपले लोकप्रतिनिधी नेमके कुठे कमी पडले? त्यांनी विधानसभेत किंवा शासनासमोर या भागाचा जोरदार पाठपुरावा का केला नाही? असे अनेक गंभीर प्रश्न आज जनतेकडून उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची इच्छाशक्ती आणि पाठपुराव्याचा अभाव यामुळेच लोहारा तालुका विकासाच्या या महत्त्वपूर्ण वाटेवर मागे पडला आहे.

संघर्ष समितीची गरज

या महत्त्वपूर्ण मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी शासनावर आणि रेल्वे प्रशासनावर योग्य तो दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वपक्षीय नेते, शेतकरी, व्यापारी, तरुण वर्ग आणि विविध सामाजिक संस्थांना एकत्र आणून एका व्यासपीठावर काम करण्याची गरज आहे.
लोहारा तालुका रेल्वे संघर्ष समिती'च्या माध्यमातून रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणापासून ते प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण होईपर्यंतचा लढा अधिक प्रभावीपणे लढता येईल.
समितीच्या माध्यमातून शासनाला निवेदने देणे, लोकप्रतिनिधींची भेट घेणे, धरणे आंदोलने आणि जनआंदोलन उभारणे यांसारखे लोकशाही मार्गावरील कायदेशीर टप्पे पार पाडता येतील.
जोपर्यंत लोहारा तालुक्याला रेल्वेच्या नकाशावर जोडले जात नाही, तोपर्यंत हा संघर्ष सातत्याने सुरू ठेवण्यासाठी एका बळकट समितीची गरज आहे. म्हणूनच, तालुक्यातील सर्व नागरिकांनी आणि सुजाण घटकांनी एकत्र येऊन तातडीने 'लोहारा तालुका रेल्वे संघर्ष समिती'ची स्थापना करावी आणि या ऐतिहासिक विकासाच्या लढ्यात आपले योगदान द्यावे, तसेच लोकप्रतिनिधींना जाब विचारत या अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपलाच,
आमीर हमजा रशीद खुटेपड
लोहारा तालुका अध्यक्ष, AIMIM तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, लोहारा
________________________

0/Post a Comment/Comments