शेंद्रा एमआयडीसी इंटरचेंजपासून दोन किलोमीटर अंतरावर चार ते पाच गायींचा महामार्गावर मुक्तसंचार; भरधाव वाहनचालकांचा जीव टांगणीला, लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला;सलग दुसऱ्या दिवशी धोकादायक प्रकार; सुरक्षा कुंपण, पोलीस गस्त आणि महामार्ग प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह!
सिंदखेडराजा / सुरेश हुसे :- कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गावर आता मोकाट जनावरांचाच मुक्तसंचार सुरू असल्याचे धक्कादायक चित्र शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) समोर आले. मुंबई कॉरिडोरवरील चॅनेल क्रमांक ७ जवळ, छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसी इंटरचेंजपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर चार ते पाच मोकाट गायी महामार्गावर आल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला. भरधाव वाहनांच्या मध्ये ही जनावरे फिरत असल्याने भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, याच मार्गावरून प्रवास करणाऱ्या सिंदखेडराजातील लोकप्रतिनिधींनी प्रसंगावधान राखून मदतीसाठी धाव घेतल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.
शनिवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावर ही जनावरे दिसून आली. समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग प्रचंड असतो. अशा परिस्थितीत अचानक गायी वाहनांसमोर आल्यास चालकाला वाहन नियंत्रित करणे कठीण होऊ शकते. काही वाहने या जनावरांच्या अगदी जवळून गेल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. एखाद्या वाहनाची जनावरांशी धडक झाली असती किंवा त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटले असते, तर अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतणारी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
या धोकादायक परिस्थितीत सिंदखेडराजा नगरपरिषदेचे गटनेते ॲड. संदीप मेहेत्रे, माजी बांधकाम सभापती गणेश झोरे, शिवसेना शहरप्रमुख बालाजी मेहेत्रे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेख यासीन हे त्या मार्गावरून प्रवास करत होते. महामार्गावरील जनावरांचा धोका लक्षात येताच त्यांनी तातडीने आपली वाहने सुरक्षित बाजूला उभी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी मोकाट गायींना महामार्गाच्या कडेला नेऊन सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यासोबतच समृद्धी महामार्ग हेल्पलाइनवर संपर्क साधून संबंधित प्रशासनाला घटनेची माहिती दिली.
या घटनेच्या निमित्ताने महामार्गावरील पोलीस यंत्रणेच्या गस्त आणि देखरेखीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. समृद्धी महामार्गासारख्या अतिवेगवान मार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस गस्त, तातडीची प्रतिसाद यंत्रणा आणि नियमित निगराणी अपेक्षित आहे. असे असताना महामार्गावर चार ते पाच मोकाट गायी मुक्तपणे फिरत असताना संबंधित यंत्रणेला याची माहिती वेळेत कशी मिळाली नाही? महामार्गावर नियमित गस्त घातली जाते का? धोकादायक ठिकाणांवर पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाची पुरेशी उपस्थिती आहे का? हेल्पलाइनवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर किती वेळात मदत पोहोचते? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत.
महामार्गावरील सुरक्षा ही केवळ वाहनचालकांची जबाबदारी नसून संबंधित पोलीस यंत्रणा आणि महामार्ग प्रशासनाचीही महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे या घटनेची दखल घेऊन संबंधित पोलीस यंत्रणेने गस्त व्यवस्थेचा आढावा घेणे आणि निष्काळजीपणा झाला आहे का, याची पडताळणी करणे आवश्यक आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा कुंपण उभारण्यात आलेले असताना मोकाट जनावरे आत प्रवेश करतातच कशी? सुरक्षा कुंपणाला भगदाड पडले आहे का? प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर पुरेशी देखरेख आहे का? संबंधित ठिकाणी सुरक्षा यंत्रणेची नियमित तपासणी होते का? असे संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहेत. सुरक्षा कुंपण आणि गस्त व्यवस्था असूनही जनावरे महामार्गावर येत असतील, तर या व्यवस्थेची परिणामकारकता तपासण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे, शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) याच समृद्धी महामार्गावर तढेगाव जवळ अपघाताची घटना घडली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोकाट जनावरांचा महामार्गावर वावर आढळल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. अपघातांच्या घटनांनंतरही प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अपेक्षित सुधारणा होत नसल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
मोठी दुर्घटना घडल्यानंतरच पोलीस आणि महामार्ग प्रशासन जागे होणार का?
समृद्धी महामार्गावर नियमित पोलीस गस्त वाढवावी, सुरक्षा कुंपणाची तातडीने तपासणी करावी, जनावरे प्रवेश करीत असलेले मार्ग शोधून बंद करावेत, सीसीटीव्ही आणि देखरेख यंत्रणेचा प्रभावी वापर करावा तसेच हेल्पलाइनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
प्रवाशांचा जीव धोक्यात असताना लोकप्रतिनिधींनी प्रसंगावधान दाखवून मदतीसाठी पुढाकार घेतला. आता महामार्ग प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनेही आपली जबाबदारी ओळखून ठोस पावले उचलण्याची गरज आहे. समृद्धी महामार्गावर सुरक्षित प्रवासाचा दावा केला जात असताना मोकाट जनावरे आणि अपुरी गस्त यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होत असेल, तर या सुरक्षेच्या दाव्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करणार? एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहण्याऐवजी संबंधित यंत्रणांनी आताच जागे होणे गरजेचे आहे.
________________________


Post a Comment