संकल्प सिद्धीस! खडकपूर्णाचे पाणी विरेगाव संपात दाखल; आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते विधिवत जलपूजन


भोकरदनकरांचा वर्षानुवर्षांचा पाणीप्रश्न निकाली; शहरात जल्लोषाचे वातावरण, महिला वर्गात विशेष आनंद!

लोकनेता न्यूज नेटवर्क 

भोकरदन / राम शिंदे :- भोकरदन शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दिलेला शब्द आज प्रत्यक्षात उतरला. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अहोरात्र घेतलेल्या कष्टांचे चीज होऊन अखेर खडकपूर्णा धरणाचे पाणी विरेगाव ता. भोकरदन येथील मुख्य संप (पंपिंग स्टेशन) येथे दाखल झाले. आज, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या पंचायती राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष पाटील दानवे यांच्या शुभहस्ते या पाण्याचे अत्यंत उत्साहात व विधिवत जलपूजन करण्यात आले.

   पाण्याचे पूजन होताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत आनंदोत्सव साजरा केला. या ऐतिहासिक क्षणामुळे भोकरदनकरांची पाण्याची प्रतीक्षा संपली असून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  या जलपूजन प्रसंगी बोलताना आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले की, "भोकरदन शहराला मुबलक आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळवून देणे, हा केवळ राजकीय विषय नसून माझा ठाम संकल्प होता. पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या माझ्या भोकरदनकर माता-भगिनी आणि नागरिकांनी माझ्यावर दाखवलेल्या अढळ विश्वासाचे हे फळ आहे. हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच भक्कम प्रशासकीय पाठबळ दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचे आम्ही मनापासून ऋणी आहोत. जनतेच्या चेहऱ्यावरील हा आनंद हीच आमच्या समाजकार्याची खरी ताकद आहे."

  यावेळी भोकरदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. गजानन तायडे यांच्यासह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

   विरेगाव संपात पाणी पोहोचल्यामुळे आता शहराच्या मुख्य जलवाहिन्यांद्वारे प्रत्येक प्रभागात नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
तालुक्याचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांची उभारणी आणि अखंड जनसेवा हाच आमचा अंतिम ध्यास असल्याचा पुनरुच्चार यावेळी आमदार दानवे यांनी केला.
________________________

0/Post a Comment/Comments