४४ गांजाची झाडे जप्त; १९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, शेतमालकाविरुद्ध दारव्हा पोलिसांत गुन्हा दाखल
लोकनेता न्यूज नेटवर्क
महागाव / सय्यद मुदस्सीर :- यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम सुरू केली असून, दारव्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नायगाव शेतशिवारात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून गांजाची ४४ झाडे जप्त केली. या कारवाईत १९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, मिलचंद आत्माराम राठोड (रा. नायगाव, ता. दारव्हा) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध धंदे, शस्त्र बाळगणारे आरोपी, गुन्हे उघडकीस आणणे तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी अधिनस्थ पथकांना गोपनीय माहिती संकलित करून प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
१६ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात गस्तीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत दारव्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नायगाव शिवारात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून तातडीने नायगाव शिवार गाठले. तेथे सापळा रचून तपासणी केली असता सर्वे क्रमांक १६/०१ मधील शेतात मिलचंद आत्माराम राठोड याच्या ताब्यातील शेतात गांजाची एकूण ४४ झाडे आढळून आली.
पंचांसमक्ष सदर गांजाची झाडे जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत १९ हजार ४५० रुपये असून, आरोपीविरुद्ध दारव्हा पोलीस स्टेशनमध्ये अंमली औषधी व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८(ब), २०(अ)(i) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्ह्यात अंमली पदार्थांची लागवड, विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कठोर भूमिका घेतली असून, अशा अवैध प्रकारांची माहिती नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा सिद्धेश्वर भोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, सफौ मुन्ना आडे, सफौ संतोष भोरगे, पोलीस हवालदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, पोलीस शिपाई सुनील पंडागळे, चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे व चालक पोलीस शिपाई राजेश जाधव यांचा समावेश होता.
________________________

Post a Comment