आश्वासनांचा महापूर फसवाच.. !

ऐन नोव्हेंबरमध्येच परभणीसह मराठवाड्याच्या घशाला कोरड, चहुबाजूंनी होतेय ओरड !

जिल्ह्यातील धरणांत अवघा १३ टक्के साठा; ‘पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही’ मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यांचा फोलपणा उघड
Ai generated image
लोकनेता न्युज नेटवर्क

परभणी | दत्तात्रय कराळे :-  जाहीर सभांची व्यासपीठे तर सोडाच, परंतु गावागावातील बारशापासून ते लग्नसोहळे आणि उद्घाटनप्रसंगी प्रत्येक कार्यक्रमात आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या लोकप्रतिनिधींचे पितळ आता उघडे पडले आहे. "मराठवाड्याने पाहिलेला हा शेवटचा दुष्काळ असेल, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही," असा कंठशोष करून सांगणारे मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते आपल्या शब्दांवर खरे उतरण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची भावना आज परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात तीव्रपणे व्यक्त होत आहे.
        नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा इतक्या तीव्र झाल्या आहेत की, पाण्याचे हे संकट थेट सर्वसामान्यांच्या चुलीपर्यंत जाऊन पोहोचले आहे. धरणं उशाला असतानाही घशाला कोरड पडण्याची वेळ पुन्हा एकदा मराठवाड्यावर आली आहे.

परभणीसह मराठवाड्यातील धरणांची भयावह स्थिती :

      जलसंपदा विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, परभणी आणि मराठवाड्यातील जलसाठ्यांची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली आहे:

परभणी जिल्ह्याचे चित्र :

        जिल्ह्यातील सर्व २८ प्रकल्पांमध्ये मिळून अवघा १२.९० टक्के उपयुक्त असा पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या निम्न दुधना (लोअर दुधना) धरणात केवळ १२ ते १३ टक्के पाणी उरले आहे, जे गेल्या वर्षी याच काळात ७५ टक्के भरले होते.

मराठवाड्याची एकूण आकडेवारी :  

       विभागातील ९२२ मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये मिळून केवळ ३८.३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे (गेल्या वर्षी हा साठा ८८.८८ टक्के होता).

प्रमुख धरणांचा तळ :  

        मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात सुमारे ६९.७९ टक्के साठा शिल्लक असला तरी, लातूरला पाणी पुरवणारे मांजरा धरण अवघ्या ५ टक्क्यांवर आले आहे. तर बीड आणि जालन्यातील अनेक लघु प्रकल्पांनी आत्ताच शून्य टक्क्यांची पातळी गाठली आहे.

पुढील भीषण संकटाची चाहूल :

         निवडणुका आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये वॉटर ग्रीड, नदीजोड प्रकल्प आणि दुष्काळमुक्तीच्या वल्गना वारंवार केल्या गेल्या. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर पाणी पोहोचवण्यात शासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे, यापेक्षा दुर्दैव ते कोणतं म्हणायचं ? विभागातील साडेतीनशेहून अधिक गावांना आत्ताच साडेपाचशेहून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला आहे.
        जर हिवाळ्याच्या सुरुवातीलाच धरणांची ही अवस्था असेल, तर आगामी उन्हाळ्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि रब्बी हंगामातील पिकांचे काय होणार, या विचारानेच शेतकरी आणि कष्टकरी वर्ग हवालदिल झाला आहे.       
        पोकळ घोषणा आणि फसव्या आश्वासनांमुळे जनतेचा विश्वासघात झाला असून, आता तरी सरकारने जागे होऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी संतप्त मागणी मराठवाडा विधायक विकास परिषदेने केली असून त्याला जनतेतून मोठा दुजोरा मिळत आहे.
________________________

0/Post a Comment/Comments