परदेशातील वैद्यकीय शिक्षणानंतर तेजस कदमचे FMGE परीक्षेत घवघवीत यश



महागावच्या शिक्षकपुत्राची वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय भरारी

लोकनेता न्यूज नेटवर्क

महागाव / सय्यद मुदस्सीर :- परदेशातून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) २०२६ ही कठीण परीक्षा महागाव येथील तेजस सुरेश कदम याने यशस्वीपणे उत्तीर्ण केली. कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने मिळविलेले हे यश कौतुकास्पद ठरत आहे.
   तेजसने सन २०२५ मध्ये परदेशातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भारतात वैद्यकीय क्षेत्रात सेवा करण्यासाठी आवश्यक असलेल्या FMGE परीक्षेची तयारी सुरू केली. वैद्यकीय ज्ञान, विषयांची सखोल समज आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची कसोटी पाहणारी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी त्याने अथक मेहनत घेतली. अखेर त्याच्या परिश्रमाला यश मिळाले.
   तेजसचे वडील सुरेश लक्ष्मणराव कदम हे महागाव येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असून आई सुरेखाताई कदम या गृहिणी आहेत. आई-वडिलांचे संस्कार, शिक्षणासाठी मिळालेले मार्गदर्शन आणि सातत्याने मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना कदम परिवारातून व्यक्त होत आहे.
शिक्षकाच्या कुटुंबातील तेजसने वैद्यकीय क्षेत्रात मिळविलेले हे यश महागावकरांसाठी अभिमानाची बाब ठरले आहे. त्याच्या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवृंद तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
   प्रतीक पाटील नरवाडे मित्रपरिवाराच्या वतीने तेजस कदम याचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून, त्याच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भविष्यात तेजसने वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून समाजातील गरजू रुग्णांची सेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
________________________

0/Post a Comment/Comments