रत्नाकर पाटील सायाळकर यांना ‘कर्मयोगी बाबासाहेब देशमुख कृषिवेद युवा उद्योजक पुरस्कार–२०२६’ प्रदान


लोकनेता न्युज नेटवर्क

बिलोली (गंगाधर शिंदे) :- सगरोळी (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळ व कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा मानाचा ‘कर्मयोगी बाबासाहेब देशमुख कृषिवेद युवा उद्योजक पुरस्कार–२०२६’ सायाळ (ता. लोहा) येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी रत्नाकर पाटील सायाळकर यांना प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व शेतकरीहितैषी मार्गदर्शक जिल्हाधिकारी . राहुल कर्डीले प्रमुख उपस्थित होते. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे विस्तार संचालक डॉ. राकेश अहिरे, संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रमोद देशमुख, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ व्यंकटराव शिंदे, माधुरी रेवनवार, कृषी शास्त्रज्ञ प्रवीण चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

रत्नाकर पाटील सायाळकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकरी गटाच्या माध्यमातून सामूहिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वाटचाल, खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याचे प्रयोग, तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी नव्या प्रयोगांकडे वळले असून शेतीतून शाश्वत उत्पन्नाचे नवे मार्ग खुले झाले आहेत.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डीले म्हणाले, “रत्नाकर पाटील सायाळकर यांच्यासारखे तरुण कृषी उद्योजक शेती क्षेत्राला नवी दिशा देत आहेत. प्रयोगशीलता, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम त्यांच्या कार्यात दिसतो. असे शेतकरीच ग्रामीण विकासाचे खरे शिल्पकार आहेत.”

सत्काराला उत्तर देताना रत्नाकर पाटील सायाळकर यांनी, “हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या शेतकरी बांधवांचा, माझ्या कुटुंबाचा आणि मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व तज्ज्ञांचा आहे. शेतीत नव्या प्रयोगांद्वारे शेतकरी समृद्ध व्हावा, हाच माझा ध्यास आहे,” अशी भावना व्यक्त केली.

कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यामुळे तरुण शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments