हे संविधान आपुले वाचून जरा घेशील ! संदेश एकतेचा सर्वांसी जरा देशील !! -डॉ. विजयकुमार कस्तुरे.....

लोकनेता न्युज नेटवर्क

बुलढाणा: दि. १४ एप्रिल, २०२६ च्या भीम जयंतीच्या पावन मुहूर्तावर महाराष्ट्रभर आपल्या सामाजिक व राष्ट्रीय विधायक तथा प्रबोधनशील उपक्रमांमुळे सदैव चर्चेत राहणाऱ्या आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच कलाध्यासी ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी आदल्या दिवशीच ऑन द स्पॉट

आपल्या सहकारी साहित्यिक मित्रांसी विचार विनिमय करून 

चळवळीची दशा व दिशा या विषयावर चर्चा सत्र व सोबतंच कविसंमेलन आयोजित केले त्यात अध्यक्ष म्हणून निमंत्रित असलेले ज्येष्ठ साहित्यिक कवी, गीतकार, गायक, कलावंत तथा बहुजन साहित्य संघ व पंचशील भजनी मंडळाचे चे संस्थापक अध्यक्ष

भीम रत्न पुरस्कृत डॉ. विजयकुमार 

कस्तुरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महापुरुषांचे विचार व्यक्त करताना.....


रे माणसा आता तर 

माणूस हो जरासा !

आपल्याच वागण्याचा 

कर तू जरा खुलासा !!


या, बाबासाहेबांच्या संविधानातील मूल्यांचे विश्लेषण करणाऱ्या स्वतःच्या काव्य गीतातील.....


हे संविधान आपुले 

वाचून जरा घेशील ! 

संदेश एकतेचा 

सर्वांसी जरा देशील !!

त्या कस्तुरेस ही दे 

थोडा तरी दिलासा.....


असे सार्थ आवाहन केवळ कुणा एका व्यक्तीला नव्हे तर देशाच्या व्यवस्थेलाच करून प्रत्येकाला विचारात पाडले. एवढेच नाही तर.....


सद्यस्थितीत माणसामाणसातील वाढत चाललेल्या आंतरीक दरीचे जीवघेणे वास्तव मांडताना.....


ग्रीष्मात सावलीला 

शोधून फार झाले !

पाणी कुठे मिळेना 

खोदून फार झाले !!

वक्षावरी धरेच्या 

मोजून वार झाले !

सत्पुत्र धर्तरीचे 

ऐसे भिकार झाले !!


या काव्यपंक्तींनी सुरुवात करून 

माणसाने माणसाला माणूस म्हणून समजून घेणे व स्विकारणे आजच्या काळात किती गरजेचे आहे हे सांगताना,


-माणूसकीच्या मागे मी पण 

माझ्या मागे यावे तू पण !

क्षणभंगुर या जीवनामाजि 

विरून जावे माझे मी पण !!


हा संदेश देतानाच बाबासाहेबांच्या -


गोटस् नॉट लॉयन्स आर सॅक्रिफाईस्ड !


या विधानाचा हवाला देत अंदाजे साठ वर्षांपूर्वी बहुतेक केसरी वृत्तपत्राच्या मथळ्याखाली कायम छापल्या जाणाऱ्या व प्रत्येकामध्ये जाज्वल्य सामाजिक प्रेम व आस्था निर्माण करणाऱ्या.....


जा छाव्यांनो करा गर्जना 

दुमदुमू द्या जयनाद पृथ्वीवर !

मानवतेवर प्रेम करा पण 

तुटून पडा जा मदमत्तावर !!


या काव्यपंक्ती मधील मतितार्थ ध्यानात घ्यावा असे प्रबोधन करून जयंतीच्या या कालखंडात बाबांच्या चळवळीतील सच्चा अनुयायी असणाऱ्या मंडळींची बौध्दांच्या विविध तीर्थे असलेल्या स्थळांना भेटी देण्याची चाललेली धावपळ खालील भावपूर्ण शब्दांत मांडली, ती अशी.....


जयभीम जयभीम जयभीमवाल्यांची 

कशी निघाली टोळी गं 

महूच्या वाटं निंघल्यात माह्या 

भिमाच्या लेकीबाळी गं.....


या गीताने सर्वांनाच भारावून टाकले. त्याच बरोबर राष्ट्रीय भावना दाखविणारा बाबासाहेबांचा पर्यावरण संवर्धनाचा आगळा वेगळा संदेश मनोरंजक लोकगीतातून मांडतांना.....


-अहो इव्हाईबापू असं काय करता

चला जोडीनं म्हसनात जावू sss

तिथं जोडीनं आन् गोडीनं

दोन दोन झाडं लावू !!


ह्या गीतातील मानवीय विचारांचा पुरस्कार करताना बाबासाहेबांनी ज्यांना गुरू मानले त्या महात्मा ज्योतीराव फुले 

यांच्या अद्वितीय सामाजिक क्रांतीचे सायना संगीत चित्रण सुध्दा.....


एकोणिसाव्या शतकामंदी 

माळी महात्मा आला वं माय !

माळी महात्मा आला वं माय 

त्यानं नवाच मंतर देला वं माय !!


या स्वरचित गीतातून आपल्या सुरेल व सुरेख आवाजात स्वतः गावून व भजनीमंडळासोबत वाद्यवृंद वाजवीत सर्वांना चकित केले.


पण तरीही जगातील १९२ देशात बाबासाहेबांची जयंती साजरी होत असताना सुद्धा आपल्या देशात मात्र अजूनही त्यांचे नांव घेतल्यास जातीवादी विचारसरणीमुळे किती मोठा संघर्ष उभा राहतो हे ही,


भीमा तुझ्या पाठी सारी 

दुनिया निघाली रे !

पण् तुझे नांव घेता बाबा 

लढाईच झाली रे !!


या प्रत्यक्ष वस्तुस्थितीची जाणीव सुद्धा आपल्या कवितेतून करून देताना,

साहित्यिक, कवि, लेखकांना मर्मावर घाव घालणाऱ्या बेडर शब्दांमधे.....


-अरे काहून लिहिता लिहिणारांनो 

लढणारांच्या कथा !

उगाच का वेशीवर नेता 

रडणारांच्या व्यथा !!

इथे कुणाचा कोण कशाला 

उपद्व्याप घडविता !

बेईमान भडव्यांचा हा तर 

मुर्दाडांचा जथा !!


हे भयानक सत्य विषद करून 

त्यांनी आता आपल्या लेखणीतून या भयग्रस्त वर्तमान व्यवस्थेला जाब विचारणारे व हादरा देणारे पण प्रबोधनाला पोषक साहित्य निर्माण करणे किती आवश्यक आहे हे नमूद करताना.....

माझ्याच घराला मी 

लावीन आग जेव्हा !

हिरोशिमा कधीही

तुमचे करीन तेव्हा !!

हा संदेश देतानाच अशी क्रांतिकारी लेखनचळवळ उभी करण्याची आणीबाणीची वेळ आली असून त्याशिवाय खरे लोकशाहीधिष्ठित वातावरण निर्माण होईल असे वाटत नाही अशी खंत व्यक्त केली.

       या संमेलनात उपस्थित शाहीर मनोहर पवार यांनी -

भीम रक्तात आहे 

भीम श्वासात आहे.....

या कविते सोबतंच सध्या महाराष्ट्रात भयानक कांड घडविणाऱ्या बुवाबाजीवर आघात करणारी, 

जावू नका बुवाच्या मठात.....

ही काव्यरचना ऐकवून सर्वांच्या मनात त्या संदर्भात प्रश्न उभा केला.

     कवी डॉ. निवृत्ती जाधव यांनी आपल्या पहाडी आवाजात घटना निर्मिती वरील रचना सादर केली.

    तर ज्येष्ठ कथाकार व कवी साहित्यिक म्हणून सर्वदूर परिचित डॉ. बबनराव महामुने, छ. संभाजीनगर यांनी आजही स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर सुध्दा समाजात आणि साहित्यिकांतही जातीभेदाची भावना कशी राहून राहून उसळी मारते हे विदारक वास्तव आपल्या, ही समानता कोणती ? या कवितेतून मांडले व सर्वांना अंतर्मुख केले.

सामाजिक क्षेत्रातील ख्यातनाम डॉ. डी. व्ही. खरात सरांनी,

सांग कधी कळणार तुला 

बुध्द माझ्या मनातला.....

या कवितेवर टाळ्या मिळवल्या.

तसेच बुलढाणा जिल्ह्यातील वृत्तपत्र संपादक तथा कवि म्हणून सुपरिचित व्यक्तिमत्त्व आयुष्मान रमेश खंडारे यांनी,

घटना देऊन गेला 

बंदिस्त गुलामांना 

मोकळे करून गेला !!

ही कविता सादर करून 

महापुरुषांचे स्मरण आपल्या मनात कायम जपले पाहिजे हा संदेश निवेदन केला.

     ग्रामीण भागातील गायिका कवयित्री छाया पानपाटील यांनी आपल्या सुंदर धाठणीने गीत गाऊन दाद मिळवली.

    तद्वतच आयुष्मान शशीकांत इंगळे यांनी आपली वैचारिक भूमिका स्पष्ट केली.

      तर विशेष म्हणजे या वैधानिक कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक तथा सूत्रसंचालक ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी सुध्दा नेहमीच्या पद्धतीने संत वचने गावून संबंधित विषयावर प्रबोधन केले.

       सुरुवातीलाच मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांच्या पूजनाने उदघाटन झालेल्या या संमेलनात अगोदर फुले -आंबेडकरी चळवळीतील विविध विद्वत्जन तथा वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी चळवळीची दशा व दिशा या विषयावर आपापले विचार मांडले.

      तसेच या निमित्ताने सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून सामूहिक सहभोजनाचा सोहळाही पार पडला.

      या वैशिष्ट्यपूर्ण आणि वैचारिक व वैधानिक कार्यक्रमांसाठी आझाद हिंद संघटना, रमाई ब्रिगेड, महानायक विचार मंच, किसान ब्रिगेड, मातृतीर्थ रणरागिणी संघटना, आझाद हिंद शेतकरी संघटना, बुलढाणा जिल्हा छ. शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बहुजन साहित्य संघ, केंद्रीय मानवाधिकार संगठन, पंचशील भजनी मंडळ इ. सह फुले - आंबेडकरी विचारांच्या सर्व मंडळींनी मोलाचे योगदान दिले.

       तसेच या सुंदर सोहळ्यामधे बहुतांश महिला पुरुष आबालवृद्ध तथा पुरोगामी विचारांच्या मंडळींनी सुरुवातीपासून उपस्थिती देवून कार्यक्रम यशस्वी केला.

________________________

0/Post a Comment/Comments