चालक-वाहक मोबाईलमध्ये गुंतले, खाजगी बस पलटी; २० ते २५ प्रवासी जखमी फर्दापूर टोलजवळ दुर्घटना; बस कारवर कोसळून चौघे जखमी
लोकनेता न्युज नेटवर्क
मेहकर :- समृद्धी महामार्गावर धावत्या लक्झरी बसमध्ये रील बनवण्याच्या नादात चालक आणि वाहकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या निष्काळजीपणामुळे बस पलटी होऊन झालेल्या अपघातात दीड वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत.
ही घटना रविवारी (१९ एप्रिल २०२६) पहाटे सुमारे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मेहकर तालुक्यातील फर्दापूर टोल नाक्याजवळ घडली. मुंबईहून पुसदकडे जाणारी एमएच २९ बीई ३२३३ क्रमांकाची लक्झरी बस समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होती. यावेळी चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात गुंतले होते. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्यावर पलटी झाली.
या भीषण अपघातात पियुष यशपाल राठोड (वय दीड वर्ष) या बालकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सरकारी व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
अपघातानंतर बस समोरील बाजूने एका कारवर कोसळली. मेहकरहून नागपूरकडे निघालेल्या एमएच ४० डीई १३४८ क्रमांकाच्या कारमधील रूपचंद गजानन बावनकुळे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले. सुदैवाने या अपघातात त्यांचा जीव वाचला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठविण्यात आले.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर वाढत्या वेगासोबतच वाहन चालवताना मोबाईल वापरण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून अपघाताची चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
________________________
.jpeg)
Post a Comment