नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श; ‘खडसे पॅटर्न’ ठरला दिशादर्शक!

प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्यात श्रीमती भंडारे यांचा मोलाचा वाटा; सन्मानाने कार्यावर शिक्कामोर्तब!

सेवा हक्क दिनी 19,850 दाखल्यांची वेळेत पूर्तता; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा | सुरेश हुसे :- सर्वसामान्य नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळावी या उद्देशाने सिंदखेडराजा उपविभागाने उभारलेला “नागरिकाभिमुख प्रशासन”चा आदर्श सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत आहे. सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि महसूल सहाय्यक श्रीमती भंडारी यांचा जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा सन्मान केवळ व्यक्तींचाच नसून, नागरिककेंद्री प्रशासन व्यवस्थेचा गौरव मानला जात आहे.

         महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेयर दाखले या अत्यावश्यक सेवांची सेवा हक्क अधिनियमानुसार वेळेत पूर्तता करत उपविभागाने प्रभावी कामगिरी केली आहे. सन 2025–26 या कालावधीत तब्बल 19,850 दाखले वेळेत वितरित करून प्रशासनाच्या जबाबदारीची जाणीव आणि कार्यक्षमतेचा प्रत्यय दिला आहे.

     विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे दाखले वेळेत मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, तातडीच्या गरजांच्या वेळी प्रा. खडसे यांनी थेट संपर्क साधणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रमाणपत्र उपलब्ध करून देत “प्रशासन तुमच्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळून प्रशासनाबद्दलचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.

     वंचित आणि भटक्या-विमुक्त समाजापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. ‘पारधी वेड्यावर सामाजिक दातृत्व’ उपक्रमांतर्गत आवश्यक कागदपत्रे संकलित करून जातीचे प्रमाणपत्र व इतर दाखले वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचा विधायक प्रयत्न झाला आहे.

      सन्मान स्वीकारताना प्रा. संजय खडसे म्हणाले, “नागरिकांना वेळेत सेवा देणे हीच खरी जबाबदारी आहे. हा सन्मान संपूर्ण टीमच्या कामाचा असून, पुढेही अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

    या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

      सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करत “जनतेसाठी प्रशासन” ही संकल्पना कृतीत उतरवणारा सिंदखेडराजा उपविभाग खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहे.

________________________

0/Post a Comment/Comments