चालकाला झोपेची डुलकी ठरली जीवघेणी; फॉर्च्युनर कंटेनरखाली घुसली भंडाऱ्यावरून परतताना काळाचा घाला; तिघे जखमी,
सिंदखेड राजा|सुरेश हुसे :- समृद्धी महामार्गावर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी दिं २३ जून रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई लेनवरील चॅनल क्रमांक 326 (5) येथे घडली.
याप्रकरणी सय्यद आरीफ सय्यद उमर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख साजेद शेख फरीद याच्याविरुद्ध किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 221/2026 दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे कुटुंबीय आणि चालक शेख साजेद हे भंडारा येथून त्यांच्या मालकीच्या फॉर्च्युनर (क्र. MH-20 HN 6768) या वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे परतत होते. समृद्धी महामार्गावर प्रवास सुरू असताना चालकाला झोपेची डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर जात असलेल्या कंटेनर (क्र. NL-01 AD 4981) ला भरधाव वेगाने मागून जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी होती की फॉर्च्युनर कार कंटेनरच्या खाली अडकली. या भीषण अपघातात डॉ. सय्यद आसीफ सय्यद उमर आणि त्यांच्या पत्नी गुलसितान सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला. तर झुनेरानबा सय्यद, अझफ सय्यद आणि चालक शेख साजेद हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 106(1), 281, 125(ब) आणि 324(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल नागरे करीत आहेत.
________________________

Post a Comment