केज कृषी विभागातील अनागोंदीचा स्फोट; तहसीलदारांच्या छाप्यात अधिकारी बेपत्ता, डॉ. वासुदेव नेहरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एल्गार

 



केज | प्रतिनिधी


खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि अनुदानाच्या सुविधा वेळेत मिळणे अपेक्षित असते. मात्र केज तालुक्यात याउलट चित्र पाहायला मिळत असून, तालुका कृषी कार्यालयाच्या कथित ढिसाळ कारभारामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केजचे तहसीलदार शुभम पवार यांनी महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह कृषी कार्यालयावर अचानक छापा टाकत पाहणी केली. या कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे.


तहसीलदार शुभम पवार, एपीआय सिरसागर, मंडळ अधिकारी भालेराव व ढाकणे यांनी कृषी कार्यालयात अचानक भेट दिली असता कार्यालयातील अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे हे कोणतीही पूर्वकल्पना अथवा अधिकृत रजा न घेता अनुपस्थित असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


विशेष म्हणजे, कृषी अधिकारी अनुपस्थित असताना त्यांच्या पदाचा कार्यभार इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आलेला नव्हता. त्यामुळे कार्यालयातील प्रशासकीय कामकाज कोणाच्या जबाबदारीवर सुरू होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तपासणी सुरू असताना किंवा पंचनामा पूर्ण होईपर्यंत वरिष्ठ अधिकारी कार्यालयात न आल्याने संताप व्यक्त करण्यात आला.


दरम्यान, तालुक्यात सोयाबीन बियाणे व खतांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. अनेक शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांचे टोकन मिळाले असले तरी प्रत्यक्ष बियाणे मिळवण्यासाठी त्यांना दोन-दोन दिवस कृषी सेवा केंद्रांबाहेर प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.


शेतकऱ्यांच्या मते, खतांचे वितरण, बियाण्यांचा साठा किंवा अनुदानित सोयाबीन वाटपाबाबत कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून त्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.


शासकीय पुरवठा वेळेत उपलब्ध होत नसल्याने काही खासगी कृषी दुकानदारांकडून बियाण्यांची चढ्या दराने विक्री होत असल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार वाढत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.


कृषी कार्यालयाच्या या कारभाराविरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रमक झाले आहेत. तालुका अध्यक्ष भगवान केदार, विकास जाधव, दत्तकुमार काकडे यांच्यासह शेकडो शेतकरी कार्यालयाबाहेर एकत्र आले होते. शेतकऱ्यांना तात्काळ बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.


तहसीलदारांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण केज तालुक्याचे लक्ष लागले आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर उघड झालेल्या या प्रकारामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

0/Post a Comment/Comments