केज | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जिवाचीवाडी गावची कु. हिंदवी परमेश्वर चौरे हिने वर्ल्ड योगासना चॅम्पियनशिप 2026 मध्ये शानदार कामगिरी करत दोन सुवर्णपदके जिंकून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. अहमदाबाद, गुजरात येथे 4 ते 8 जून दरम्यान झालेल्या या स्पर्धेत हिंदवीने "ट्रेडिशनल ग्रुप" आणि "फॉरवर्ड बेंडिंग" या प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावत दुहेरी यश संपादन केले.
जगभरातील विविध देशांतील स्पर्धक सहभागी झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत हिंदवीने उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर भारताला गौरव मिळवून दिला. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिवाचीवाडी गावासह संपूर्ण केज तालुका आणि बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेनंतर झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात योगासना भारताचे अध्यक्ष श्री. जयदीप आर्या आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन डायरेक्टर डॉ. संजय मालपाणी यांच्या हस्ते हिंदवीला सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. या सन्मानामुळे तिच्या यशात आणखी भर पडली.
हिंदवीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, महिला आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहून मेहनतीच्या बळावर जागतिक स्तरावर यश मिळवू शकते, हे हिंदवीने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.
हिंदवी चौरेच्या या यशामुळे जिवाचीवाडी गावाचे नाव आता देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून तिची कामगिरी संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
हिंदवी, आम्हाला तुझा अभिमान आहे! Proud of You Hindavi! :::

Post a Comment