सिंदखेड राजा (राहुल झोटे) :- शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सिंदखेड राजा तहसील कार्यालय परिसरात शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी कमालीचा आक्रमक पवित्रा घेतला. या आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी थेट तहसील कार्यालयाच्या छतावर चढून, तर एका कार्यकर्त्याने मुंडण करून शासनाचा तीव्र निषेध केला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दराडे नामक कार्यकर्त्याने सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर मुंडण करून सरकारचा निषेध केला. तर दुसरीकडे, विनायक पाटील भानुसे, गजानन जायभये आणि प्रदीप मेहेत्रे या शेतकऱ्यांनी थेट तहसील कार्यालयाच्या छता वर चढून हातात 'रुमण्हे' (शेतीचे अवजार) घेऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बालाजी सोसे यांना सकाळीच ताब्यात घेतले होते. तहसीलच्या छतावर आंदोलन सुरू झाल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आणि परिसरात भीतीयुक्त तणाव निर्माण झाला.घटनेची गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक आशिष इंगळे,पोलीस हेडकॉन्स्टेबल नगरे,दांडगे,रामप्रसाद खर्डे आणि श्रावण डोंगरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अत्यंत शिताफीने छतावरील आंदोलकांना सुरक्षितपणे खाली उतरवले आणि त्यांना ताब्यात घेतले.या सर्व आंदोलकांवर मुंबई पोलीस कायद्यांतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली असून, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १६८ अन्वये त्यांना स्थानबद्ध (डिटेन) करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे सिंदखेड राजात सध्या शेतकरी प्रश्नावरून वातावरण चांगलेच तापले आहे.
________________________

Post a Comment