१२ लाखांच्या लाचेचा सौदा; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात !

अवैध वाळू माफियांना अभय देण्यासाठी मागितली कोट्यवधींच्या धंद्यातील ‘हफ्ता’ रक्कम; ६.४० लाखांची लाच स्वीकारताना अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण रंगेहात अटक!

लोकनेता न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर :- अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या काळ्या साम्राज्याला संरक्षण देण्यासाठी तब्बल १२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारे अंबड (जि. जालना) येथील तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शनिवारी (दि. ६ जून) सायंकाळी रंगेहात पकडल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या आलिशान निवासस्थानी ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

      प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराच्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीनवर महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होऊ नये तसेच सहा हायवा टिप्पर वाहने सुरळीत सुरू राहावीत यासाठी तहसीलदार चव्हाण यांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती. पोकलेन मशीनवरील कारवाई रोखण्यासाठी प्रतिदिन दीड लाख रुपये या दराने आठ दिवसांचे १२ लाख रुपये आणि टिप्पर वाहनांमागे स्वतंत्र रक्कम अशी मागणी करण्यात आली होती.

        विशेष म्हणजे, या व्यवहारातील ८ लाख रुपये यापूर्वीच चव्हाण यांच्याकडे पोहोचल्याचा आरोप आहे. मात्र उर्वरित रक्कम देण्यास नकार देत तक्रारदाराने २६ मे रोजी बीड येथील एसीबी कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर एसीबीने अत्यंत गोपनीय पद्धतीने पडताळणी केली असता लाचेची मागणी सत्य असल्याचे निष्पन्न झाले.

तडजोडीअंती ६.४० लाखांवर व्यवहार ठरला

         पडताळणीदरम्यान तहसीलदार चव्हाण यांनी उर्वरित रकमेबाबत तडजोड करून ६ लाख ४० हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार बीड एसीबीच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथील वेस्ट बीड बायपास रोडवरील कासलीवाल मार्वल सोसायटीमध्ये सापळा रचला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने धाड टाकून चव्हाण यांना रंगेहात पकडले.

झडतीत मोबाईल, ॲपल वॉच, सोन्याचे दागिने जप्त

      कारवाईनंतर करण्यात आलेल्या अंगझडतीमध्ये सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, ॲपल वॉच, सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याचे लॉकेट आणि रोख ६ हजार ३७० रुपये आढळून आले. त्यानंतर त्यांच्या घराची सखोल झडती घेण्यात येत असून आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महसूल विभागात खळबळ

        एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याच्या चर्चांना या कारवाईमुळे पुन्हा एकदा उधाण आले आहे. एसीबीच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एसीबीच्या पथकाची धडक कारवाई

      पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले, पोलीस निरीक्षक समाधान कवडे तसेच मच्छिंद्र बीडकर, अमोल खरसाडे, प्रदीप सुरवसे आणि अंबादास पुरी यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

नागरिकांसाठी एसीबीचे आवाहन

     कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर अथवा ९२७०२२१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.

________________________

0/Post a Comment/Comments