लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा | सुरेश हुसे :- राहेरी येथील खडकपूर्णा नदी पुलाजवळ सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल व साफसफाईच्या कामामध्ये मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा दैनिक लोकनेताने दिनांक १६ जून रोजी ठळकपणे मांडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबंधित ठेकेदार चौरसिया कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभाग, अमरावतीचे कार्यकारी अभियंता यांनी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावत २४ तासांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दैनिक लोकनेतामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात राहेरी पुलाजवळील कामाच्या ठिकाणी अनेक मजूर हेल्मेट, सुरक्षा जॅकेट, सुरक्षा बूट, रिफ्लेक्टरयुक्त कपडे यांसारख्या आवश्यक सुरक्षा साहित्याविना काम करत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते दीपक कायदे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.
या वृत्तानंतर स्थानिक नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पुल परिसर हा वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील असताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडेही सामाजिक कार्यकर्ते दीपक कायदे यांच्या तक्रारी पोहोचल्या.
त्यानंतर विभागाने केलेल्या प्राथमिक पडताळणीत कामाच्या ठिकाणी मानक सुरक्षा व्यवस्थेचा अभाव, अपुरे बॅरिकेडिंग, ब्लिंकर व परावर्तित सूचना फलकांची कमतरता तसेच सुरक्षाविषयक गंभीर त्रुटी असल्याबाबत आक्षेप नोंदविल्याची माहिती समोर आली आहे.
कार्यकारी अभियंता यांनी जारी केलेल्या पत्रात सार्वजनिक सुरक्षा, वाहतुकीची सुरक्षितता आणि कामगारांचे संरक्षण ही ठेकेदाराची करारानुसार बंधनकारक जबाबदारी असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. या जबाबदाऱ्यांचे पालन करण्यात झालेल्या कथित निष्काळजीपणाबाबत कंपनीकडून तातडीने स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
‘स्टॉप वर्क’चा इशारा
राष्ट्रीय महामार्ग विभागाने कंपनीला दिलेल्या नोटिशीत निकृष्ट अथवा अपुरी सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समाधानकारक खुलासा न मिळाल्यास काम तात्काळ बंद करण्याचे आदेश, आर्थिक दंड आणि करार रद्द करण्यासह कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
लोकनेता वृत्तानंतर प्रशासन जागे
राहेरी पुलावरील सुरक्षेचा प्रश्न दैनिक लोकनेताने उचलून धरल्यानंतर संबंधित यंत्रणा सक्रिय झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. विकासकामे वेगाने पूर्ण होणे महत्त्वाचे असले तरी मजुरांच्या जीविताच्या सुरक्षेशी तडजोड होऊ नये, हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. आता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नोटिशीनंतर चौरसिया कन्स्ट्रक्शन कंपनी कोणता खुलासा देते आणि प्रत्यक्ष सुरक्षाव्यवस्थेत काय सुधारणा करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
________________________

Post a Comment