सोयाबीन बियाणे न उगवल्याची तक्रार; आडगाव राजातील शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे धाव!

'अंकुर २०११-३५' बियाण्याबाबत शंका; पंचनामा, तपासणी व नुकसानभरपाईची मागणी

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेडराजा | सुरेश हुसे :- खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात असताना सिंदखेडराजा तालुक्यातील आडगाव राजा येथील काही शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली आहे. संबंधित बियाण्याची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासावी, तसेच योग्य ती कार्यवाही करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
      तक्रारीनुसार, आडगाव राजा येथील शेतकरी लक्ष्मण विठ्ठल वाघमारे, विजय वाघमारे आणि गजानन खंदारे यांनी सिंदखेडराजा येथील विक्रेत्याकडून 'अंकुर २०११-३५' या सोयाबीन बियाण्याची पिशवी सुमारे ३,२०० रुपयांना खरेदी केली होती. २७ जून रोजी त्यांनी आपल्या शेतात या बियाण्याची पेरणी केली. मात्र पेरणीनंतर चार ते पाच दिवस उलटूनही अपेक्षित प्रमाणात उगवण झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बियाण्याची उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून, बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर झालेला खर्च वाया गेल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
     या संदर्भात शेतकऱ्यांनी १ जुलै रोजी सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत संबंधित शेताची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, बियाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी आणि तपासणीत दोष आढळल्यास नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
        दरम्यान, पावसाचे अनिश्चित वातावरण आणि पेरणीचा कालावधी लक्षात घेता अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन कृषी विभागाने वस्तुनिष्ठ तपासणी करावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या अहवालानंतरच बियाण्याच्या गुणवत्तेबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून, पुढील कार्यवाहीकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments