महीमा राखीचा.....!

AI-जनरेटेड इमेज
लोकनेता न्युज नेटवर्क

बाई राखीच्या धाग्याची 

मला ओढ लय वाटे !

लाला भाऊराया माहा 

जणू राजावाणी वाटे !!


बाई राखीच्या धाग्याची 

सारी महीमाच न्यारी !

कुकू तांदळाचं ताटं 

पोरी उभ्या घरीदारी !!


बाई राखीचा हा धागा 

दिसायला तसा साधा !

पन् किमया तं बघा 

बंधू पाठीशी हा सदा !!


बाई राखीचा हा धागा 

जग त्याच्यापुढे थीटं !

भाऊ गोरापान माहा 

त्याची काढू देना दिठं !!


बाई राखीच्या दोऱ्यात 

साऱ्या दुनियेची माया !

दिसे भावाचा मुखडा 

मोहरून जाई काया !!


बाई राखीचा हा दोरा 

जणू प्रेमाचा खजिना !

नवलाख्या हारामंदी 

बधू माहा गं नगिना !!


बाई राखीच्या रूपांत 

दिसे मायेचा हा डोहं !

दरसाल येई तरी 

कधी सुटला ना मोहं !!


बाई राखीचा हा धागा 

बोले हुमायून भाऊ !

राणी कर्मवती साठी 

संकटात धाव घेऊ !!


बाई राखीच्या धाग्यानं 

जणू कमालंच केली !

एका मोगल राजानं 

तिला कपाळी लावली !!


बाई राखीच्या दिसालं 

हारे भूकं नि तहानं !

त्यानं दुनियेत साऱ्या 

केला भारत महानं !!


बाई राखीचं हे रूपं 

आसं लोभसं लोभसं !

बहीणीच्या भेटीसाठी 

भाऊ चाले कोसं कोसं !!


बाई राखीच्या सूताचा 

नाही मावळे सुवासं !

त्यानं भारत मातेचं 

नांव केलं देसोदेसं !!


बाई राखीच्या सूतातं 

फूलं मायेची गुफली !

राही बांधे राखी, भाऊ 

तोले इटाची टोपली !!


बाई राखीचा पदरं 

दोऱ्या दोऱ्यानं गुफला !

जणू मायेचा हा मळा 

भाऊ माळ्यानं शिपला !!


बाई राखीची किमया 

वर्णू वर्णू सांगू किती !

बांधू कस्तुरेच्या हाती 

इसरूनं जातीपाती !!


रचना:- ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे.....

९८५०२७५१०४,

९५५२०९४०४९.....

________________________

0/Post a Comment/Comments