भाकपच्या पाठपुराव्याला यश; झोपडीतून जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत स्थलांतर
एटापल्ली :- ग्रामपंचायत चोकेवाडा अंतर्गत येणाऱ्या चोकेवाडा टोला येथील एका जीर्ण झोपडीत जीव धोक्यात घालून भरणाऱ्या मिनी अंगणवाडीचे अखेर जिल्हा परिषद शाळेच्या अतिरिक्त खोलीत स्थलांतर करण्यात आले आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने केलेल्या या कारवाईमुळे अंगणवाडीतील सुमारे १० चिमुकल्या बालकांना मोठा दिलासा मिळाला असून, पालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
चोकेवाडा टोला येथे मिनी अंगणवाडीसाठी स्वतःची स्वतंत्र इमारत उपलब्ध नसल्यामुळे ती बऱ्याच दिवसांपासून एका झोपडीत चालवली जात होती. पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे लहान बालकांच्या आरोग्यासह सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तसेच बालकांना योग्य पोषण आहार, आरोग्य सेवा आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देताना शिक्षक व पालकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत होता.
स्थानिक बालकांच्या या गंभीर समस्येची दखल घेत भारतीय कम्युनिस्ट पार्टी गडचिरोली जिल्हा समितीने प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरवले. भाकपच्या वतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी, एटापल्ली यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करून चोकेवाडा टोला येथील मिनी अंगणवाडीसाठी त्वरित सुरक्षित आणि पक्की जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती.
बाल विकास अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी
भाकपच्या या निवेदनाची गंभीर दखल घेत बाल विकास अधिकारी विद्याधर बुरीवार यांनी स्वतः चोकेवाडा टोला येथे जाऊन प्रत्यक्ष गावभेट दिली. तेथील अंगणवाडीच्या सद्यस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी तत्काळ सकारात्मक पावले उचलत मिनी अंगणवाडीचे जिल्हा परिषद शाळेच्या अतिरिक्त खोलीत स्थलांतर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, यासंबंधीच्या कारवाईची सविस्तर माहिती त्यांनी भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ.सचिन मोतकुरवार यांना पत्र देऊन कळवली.
प्रशासनाच्या या जलद गतीच्या कार्यवाहीमुळे आता या भागातील लहान बालकांना झोपडीच्या त्रासापासून मुक्ती मिळून एका सुरक्षित आणि पक्क्या इमारतीतील खोलीत बसण्याची व शिक्षणाचे धडे गिरवण्याची सोय झाली आहे. या सकारात्मक बदलामुळे चोकेवाडा टोला येथील ग्रामस्थ व पालकांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण पसरले आहे.
हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ.सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ.सुरज जक्कुलवार यांच्यासह स्थानिक गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
"चोकेवाडा टोला येथील मिनी अंगणवाडी झोपडीत सुरू असल्यामुळे लहान बालकांना आणि शिक्षकांना अनेक दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागत होता. या लोकहिताच्या प्रश्नावर भाकपाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. बाल विकास अधिकारी विद्याधर बुरीवार यांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन स्वतः गावभेट दिली आणि अंगणवाडीचे झोपडीतून जिल्हा परिषद शाळेच्या अतिरिक्त खोलीत स्थलांतर केले. त्यामुळे बालकांना हक्काची आणि पक्की इमारत मिळाली, याचे आम्हाला मनस्वी समाधान आहे. आमच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल आम्ही संबंधित प्रशासनाचे आभार मानतो."
कॉ.सचिन मोतकुरवार,जिल्हा सहसचिव, भाकपा गडचिरोली________________________


Post a Comment