एटापल्लीत नवरात्रोत्सवाला सामाजिक सेवेची जोड; भव्य आरोग्य शिबिरात ६० रुग्णांची तपासणी



युवाशक्ती दुर्गोत्सव तथा महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचा स्तुत्य उपक्रम; नागरिकांकडून कौतुक

लोकनेता न्युज नेटवर्क
 

एटापल्ली :-  धार्मिक उत्सवाला सामाजिक भान आणि जनसेवेची जोड देत, एटापल्ली येथील युवाशक्ती दुर्गोत्सव तथा महात्मा ज्योतिबा फुले दुर्गा मंडळ यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील ६० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन पुरवण्यात आले.

शिबिराचे उद्‌घाटन मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय एटापल्लीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उईके आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी,रक्तदाब,रक्तातील साखर तसेच विशेष रक्त चाचण्यांमध्ये किडनी फंक्शन टेस्ट व लिव्हर फंक्शन टेस्ट करण्यात आल्या. याशिवाय,शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून पात्र लाभार्थ्यांसाठी 'आयुष्मान भारत गोल्डन कार्ड' काढून देण्याची विशेष सोय उपलब्ध करण्यात आली होती.

केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता,समाजातील गरजूंना आरोग्यसेवा पुरवून मंडळाने सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

शिबिराच्या यशस्वितेसाठी मंडळाचे सल्लागार श्रीकांत कोकुलवार,अध्यक्ष हेमंत मोहुर्ले,विजय अतकमवार,शैलेश वरखडे,पवन नीलीवार,डॉ. रामचंद्र आसुटकर यांच्यासह महिला पदाधिकारी उषाताई ठाकरे,पौर्णिमाताई श्रीरामवार,सरिताताई राजकोंडावार,मधुताई पुण्यमूर्तीवार व सौजन्या अतकमवार यांनी विशेष परिश्रम घेतले.आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.________________________

0/Post a Comment/Comments