कंधार तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली!
दीड महिन्यापासून पावसाची दडी; २८९६५ हजार हेक्टरवरील सोयाबीन संकटात, रब्बी हंगामाचे भवितव्य अधांतरी...
कंधार । धोंडीबा मुंडे :- कंधार तालुक्यात पावसाने दीड महिन्यापासून दडी मारल्याने शेती आणि शेतकऱ्यांवरील संकट अधिक गडद झाले आहे. हिरवीगार दिसणारी शेतशिवारं आता पावसाअभावी करपून पिवळी पडू लागली असून, हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाची वाताहत झाली आहे. ज्वारीची वाढ खुंटली असून, कापूस पिकालाही पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा फटका बसत आहे. खरीप हंगामातील उत्पादन घटण्याची भीती असतानाच, रब्बी हंगामासाठी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील काही वाडी-तांड्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने आगामी काळात पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
गतवर्षीच्या तुलनेत पावसाची मोठी तूट
कंधार तालुक्यात आतापर्यंत ५७७.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत तब्बल १२३५.७० मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा पावसाच्या प्रमाणात मोठी तूट निर्माण झाली आहे. उत्तरा नक्षत्रापाठोपाठ हस्त नक्षत्रही कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा परतीच्या पावसावर टिकून होत्या. मात्र, परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाचा खंड आणखी लांबल्यास शेती उत्पादनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कंधार तालुक्यातील सुमारे २८९६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाला पावसाच्या लांबलेल्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या निर्णायक अवस्थेत पाऊस गायब झाल्याने अनेक भागांतील पिके करपून गेली आहेत. शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी हिरव्यागार पिकांऐवजी वाळलेल्या पाचोळ्याचे चित्र दिसत आहे. ज्वारी पिकाची वाढही खुंटली असून, कापसाला अपेक्षित वाढ आणि बोंडधारणेसाठी आवश्यक ओलावा मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पन्नात मोठी घट होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
सणासुदीवरही दुष्काळाचे सावट दसरा आणि दिवाळी हे सण जवळ आले,असताना शेतीच्या उत्पन्नावरच पाणी फिरण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची भीती आहे. खरीप हंगामातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, तर आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बीच्या पेरणीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि नुकसानभरपाईची मागणी
तालुक्यातील काही वाडी-तांड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेऊन गरज असलेल्या गावांमध्ये आणि वाडी-तांड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच, पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, रोजगार हमीची कामे सुरू करून ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पावसाचा खंड कायम राहिल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण रोजगार या तिन्ही आघाड्यांवर संकट तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंधार तालुक्यातील परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.________________________

Post a Comment