बहादरपुरा पुलाच्या दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा!



 पार्वती गुट्टे यांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन; संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणी! 


लोकनेता न्यूज नेटवर्क

 कंधार : धोंडीबा मुंडे :- कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील मन्याड नदीवरील पुलावरून चारचाकी वाहन नदीत कोसळून सावरगाव वाडी (ता. मुखेड) येथील पार्वती गुट्टे वय ४२ वर्षे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुलाची धोकादायक अवस्था, सुरक्षा कठड्यांचा अभाव आणि वाहतुकीसाठी पूल पुन्हा खुला करण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित करत, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे कंधार शहराध्यक्ष यन्नावार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
       मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सुमारे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बहादरपुरा येथील मन्याड नदीवरील पुलावरून एक चारचाकी वाहन नदीत कोसळले. या दुर्घटनेत पार्वती गुट्टे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर लक्ष्मण गुट्टे यांनी आपले प्राण वाचविले. या घटनेमुळे पुलाच्या सुरक्षिततेचा आणि संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
     पूल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कोणाच्या आधारावर?
    पूल खराब अवस्थेत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑगस्ट २०२६ मध्ये तो वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र, ऑक्टोबर २०२६ मध्ये तो पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला असल्यास, हा निर्णय कोणत्या तांत्रिक निकषांवर आणि कोणाच्या परवानगीने घेण्यात आला, असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे,पूल पुन्हा सुरू करण्यापूर्वी त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली होती का? आवश्यक दुरुस्ती पूर्ण झाली होती का? पुलावर सुरक्षा कठडे उभारण्यात आले होते का? तसेच पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणित करण्यात आले होते का? या सर्व बाबींची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निष्काळजीपणा आढळल्यास फौजदारी कारवाईची मागणी
   पुलाची दुरवस्था, सुरक्षा कठड्यांचा अभाव किंवा वाहतुकीस परवानगी देताना झालेला संभाव्य निष्काळजीपणा या दुर्घटनेस कारणीभूत ठरला आहे का, यांचा तपास करण्यात यावा. चौकशीत संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची निष्काळजी अथवा कर्तव्यात कसूर आढळल्यास त्यांच्यावर लागू कायद्यानुसार कठोर फौजदारी कारवाई करावी. तसेच या प्रकरणात सदोष मनुष्यवधासंबंधीची तरतूद लागू होते का, याची कायदेशीर निकषांनुसार तपासणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती वरिष्ठ अधिकाऱ्यांना या निवेदनाच्या प्रती संबंधित मंत्री, नांदेडचे जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी,कार्यकारी अभियंता,तहसीलदार आणि संबंधित पोलीस ठाण्याला पाठविण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
             
 पुलाची तपासणी करून सुरक्षिततेच्या उपाययोजना करा

   मन्याड नदीवरील पुलाची तातडीने तांत्रिक तपासणी करावी. पूल सुरक्षित असल्याचे स्पष्ट होईपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक बंद ठेवावी. पुलावर सुरक्षा कठडे, धोक्याचे फलक आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित कराव्यात.तसेच मृत पार्वती गुट्टे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
______________________
               
एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तरी प्रशासनाने पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा.या दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका निवेदनातून मांडली आहे.
________________________

0/Post a Comment/Comments