सातबारावर बोजा असलेल्या शेतकऱ्यांची पीककर्जासाठी बँकांकडून अडवणूक

 

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली ..


 बँकांची दादागिरी खपवून घेणार नाही - नारायण लोखंडे



लोकनेता न्यूज नेटवर्क 

भोकरदन/राम शिंदे :-  लीड मॅनेजर आणि कलेक्टरांना बळीराजा फाऊंडेशनचे निवेदन, ८ दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होऊनही बँकांकडून मुद्दाम तफावत काढून शेतकऱ्यांची खाती बंद केली जात नसल्याने आणि सातबारा उताऱ्यावर इतर सहकारी बँक व पतसंस्थेचा वैयक्तिक कर्जाचा बोजा असलेल्या शेतकऱ्यांचे नवीन पीककर्ज नाकारले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बँकांची ही दादागिरी बळीराजा फाऊंडेशन खपवून घेणार नाही, असा इशारा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी दिला आहे.

    या संदर्भात बळीराजा फाऊंडेशनच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आणि लीड बँक मॅनेजर मंगेश केदार यांना निवेदन देण्यात आले.

    निवेदनात म्हटले आहे की, शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम जमा होण्यास वेळ लागत आहे. या काळात बँकांनी पीककर्ज थकीत दाखवून नवीन कर्ज नाकारले. त्यामुळे हंगाम वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी इतर बँका व पतसंस्थांकडून वैयक्तिक कर्ज घेतले. आता त्या कर्जाचा बोजा सातबाऱ्यावर चढवला गेला असून, ते वैयक्तिक कर्ज असल्याचे प्रमाणपत्र बँका देत नसल्याने पीककर्ज रखडले आहे.

    तसेच शासनाकडून जमा झालेली कर्जमाफीची रक्कम आणि प्रत्यक्ष थकबाकी यात तफावत आहे. बँकांनी ती तफावत समायोजित करण्याचे मान्य करूनही एक महिना उलटूनही खाती बंद केलेली नाहीत. परिणामी कर्जमाफी मिळूनही शेतकरी नव्या कर्जापासून वंचित आहे.


बळीराजा फाऊंडेशनच्या ५ प्रमुख मागण्या -

१) तफावत असलेल्या खात्यांचा बँकनिहाय आढावा घेऊन पात्र शेतकऱ्यांची खाती तात्काळ बंद करावीत.

२) कर्जमाफी जमा होऊनही खाते बंद न झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज देण्याचे लेखी आदेश बँकांना द्यावेत.

३) सातबाऱ्यावर वैयक्तिक कर्जाचा बोजा असलेल्यांना ते कर्ज वैयक्तिक असल्याचे प्रमाणपत्र देऊन पीककर्ज द्यावे.

४) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांच्या वैयक्तिक कर्ज वसुलीबाबतच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी बँकांना लेखी सूचना द्याव्यात.

५) वाढलेले पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांमध्ये मनुष्यबळ वाढवून प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत.


जर ८ दिवसात कार्यवाही झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नारायण लोखंडे यांनी दिला आहे.यावेळी बंडू जाधव, अमोल खांडवे,राहुल साबळे,आदींची उपस्थिती होती. 


प्रतिक्रिया 

    वैयक्तिक कर्जाचा बोजा आणि सिव्हिलमुळे शेतकऱ्यांचे पीक कर्ज अडवू नका असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बॅंक प्रशासनाला दिलेले आहेत. मात्र राष्ट्रीयीकृत बॅंका शेतकर्‍यांची अडवणूक करीत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यामुळे बँकांची मनमानी आणि दादागिरी खपवून घेणार नाही. शेतकर्‍यांच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहोत. 

नारायण लोखंडे- अध्यक्ष बळीराजा फाऊंडेशन 


जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांना निवेदन देतांना बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे________________________

0/Post a Comment/Comments