अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणातील फरार आरोपीस लातूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

आदर्श इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकास अखेर अटक; तीन विशेष पथकांची अथक शोधमोहीम


लोकनेता न्युज नेटवर्क 

लातूर :- अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आदर्श इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकास अखेर लातूर पोलिसांनी अटक केली आहे. बशीर उस्मान शेख (वय 54 वर्षे, रा. प्रकाश नगर, लातूर), संस्थापक/प्राचार्य, आदर्श इंटरनॅशनल स्कूल, आदर्श कॅम्पस, प्रकाश नगर, लातूर, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


एमआयडीसी पोलीस ठाण्यात CR No. 687/2026 अन्वये BNS कलम 74, 76, 351(2) तसेच POCSO कायद्याच्या कलम 8 व 12 अन्वये अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गुन्हा दाखल होण्याच्या एक दिवस अगोदरच आरोपी फरार झाल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले होते. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्यास अटक करण्यासाठी लातूर पोलिसांनी विशेष शोधमोहीम हाती घेतली.


तीन विशेष पथकांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम


  या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चावरे यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकारी व बारा पोलीस अंमलदारांची तीन विशेष पथके तयार करण्यात आली.

   या पथकांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी उदगीर, उमरगा, पुणे, पनवेल आणि पालघर आदी ठिकाणी सातत्याने तपास व शोधमोहीम राबविली. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

  पोलिसांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. आरोपी काल रात्री उशिरा पोलिसांच्या हाती लागला. त्यास ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अटक करण्यात आली आहे.


पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाचा सातत्याने आढावा


अल्पवयीन मुली, विद्यार्थी तसेच महिला विषयक गुन्ह्यांबाबत लातूर पोलीस दलाची भूमिका अत्यंत संवेदनशील आणि गांभीर्याची आहे. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांची माहिती प्राप्त होताच तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आरोपीच्या अटकेबाबत सातत्याने आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार विशेष पथकांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून फरार आरोपीचा अखेर शोध घेत त्यास अटक केली.

  सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

________________________

0/Post a Comment/Comments