घागर डोक्यावर अन् विकास कागदावर;महादेव तांड्याची पाण्यासाठी भटकंती!

 

 वर्षानुवर्षांचा संघर्ष कायम; तांडा वसल्यापासून पक्का रस्ता आणि शाश्वत पिण्याच्या पाण्याची सोय कागदावरच

लोकनेता न्यूज नेटवर्क

  कंधार| धोंडीबा मुंडे  :- तालुक्यातील फुलवळ ग्रामपंचायतीअंतर्गत असलेला महादेव तांडा आजही मूलभूत सुविधांपासून कोसोदूर आहे. तांडा अस्तित्वात आल्यापासून येथील नागरिकांचा पक्का रस्ता आणि पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे. वर्षानुवर्षे मागण्या, निवेदने आणि आश्वासनांचा पाऊस पडत असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.

        महादेव तांड्यात ना पक्का रस्ता, ना शाश्वत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशी दयनीय स्थिती आहे. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली ग्रामपंचायतीकडून विविध माध्यमांतून निधी खर्च झाल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात तांड्यातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे शासनाचा निधी नेमका कुठे खर्च होतो, असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

     पाणी आणि रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडे निवेदने दिली. प्रत्यक्ष भेटी घेऊन समस्या मांडल्या. एवढेच नव्हे, तर प्रश्न सुटत नसल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला. मात्र प्रत्येक वेळी आश्वासनांपलीकडे ठोस कार्यवाही झाली नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

        निवडणुका जवळ आल्या की मतांसाठी आश्वासनांची खैरात करणारे नेते निवडणूक संपल्यानंतर मात्र तांड्याकडे फिरकत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी, आजही दिवसाची सुरुवात येथील महिलांची डोक्यावर घागर घेऊन पाण्याच्या शोधात होणाऱ्या पायपिटीने होते. कडक उन्हाळा असो, मुसळधार पाऊस असो अथवा कडाक्याची थंडी—महादेव तांड्यातील नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती मात्र थांबलेली नाही.

आमदारांकडे वारंवार मागणी, तरी प्रश्न जैसे थे!

तांड्यातील नागरिकांनी आतापर्यंत झालेले माजी आमदार तसेच विद्यमान आमदार यांची वारंवार भेट घेऊन “तांड्यावर जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ता द्या आणि कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा,” अशी एकमुखी मागणी केली आहे. मात्र अनेक वर्षे पाठपुरावा करूनही दोन्ही मूलभूत प्रश्न अद्याप कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.


आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे!

महादेव तांड्यातील नागरिकांना आता आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष विकासकामांची गरज आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन तांड्याला पक्का रस्ता तसेच कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिला-पुरुषांसह ग्रामस्थांनी केली आहे.

________________________

0/Post a Comment/Comments