जन आंदोलन आधार संघर्ष समितीचा आक्रमक एल्गार; कर्जवसुलीला स्थगिती देण्यासह महिलांचा मानसिक छळ थांबविण्याची मागणी
महागाव सय्यद मुदस्सीर
यवतमाळ : कोरड्या दुष्काळामुळे हाताला काम नाही, घरात उत्पन्नाचे साधन नाही, अशा बिकट परिस्थितीतही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी महिलांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारींनी आता तीव्र स्वरूप धारण केले आहे. या अन्यायाविरोधात जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेकडो महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या.
दुष्काळामुळे शेतकरी व शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावली आहे. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते भरण्यासाठी महिलांना दमदाटी करणे, मानसिक त्रास देणे, रात्री-अपरात्री घरी जाणे तसेच व्हिडिओ कॉलद्वारे दबाव आणणे, असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी महिलांनी मांडल्या.
समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. दुष्काळग्रस्त कर्जदारांना दिलासा देण्यासाठी मायक्रो फायनान्स कर्जवसुली व हप्ते भरण्यास तात्पुरती स्थगिती द्यावी, महिलांचा मानसिक छळ थांबवावा आणि नियमबाह्य वसुली करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
दुष्काळात रोजगार नाही, घरात पैसा नाही, मग कर्जाचे हप्ते भरायचे तरी कसे? असा सवाल उपस्थित करीत नरवाडे यांनी प्रशासनाने महिलांच्या व्यथा समजून घेऊन तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी शारदा फोन करपे, आरती गजानन मस्के, गंगा भगवान काळे, छायाबाई राऊत, शशिकला सुनील आसोले, परवीन फिरोज पठाण यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
जगदीश नरवाडे यांचा प्रशासनाला इशाराजनतेचा संयम तुटण्याआधी कर्जवसुली स्थगितीचे आदेश काढा!“जनतेने कायदा हातात घेण्याची वेळ येण्याआधीच प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी. दुष्काळामुळे जनता आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारा वसुलीचा दबाव आणि महिलांचा मानसिक छळ तात्काळ थांबविणे गरजेचे आहे. जनतेचा संयम तुटण्याअगोदर जिल्हाधिकारी महोदयांनी तातडीने कर्जवसुली स्थगितीचे आदेश काढून दुष्काळग्रस्त महिलांना न्याय द्यावा
जगदीश नरवाडे
संस्थापक अध्यक्ष, जन आंदोलन आधार संघर्ष समिती
________________________

Post a Comment