जिंतूरमध्ये मायक्रो फायनान्सच्या सक्तीच्या वसुली विरोधात आंदोलन



शेतकरी, महिला बचत गटांना दिलासा देण्याची मागणी; नायब तहसीलदारांना निवेदन

लोकनेता न्यूज नेटवर्क 

 जिंतूर : रत्नदीप शेजावळे :- दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी आणि महिला बचत गटांना मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कथित सक्तीच्या कर्जवसुलीतून दिलासा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी जिंतूर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांकडे सादर करण्यात आले. कर्जवसुलीच्या नावाखाली कर्जदारांना धमकावणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि बचत गटातील महिलांवर दबाव आणण्याच्या कथित प्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.


    तालुक्यातील दुष्काळ, शेतीतील घटलेले उत्पादन आणि रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व महिला बचत गट आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत काही वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी कर्जदारांच्या घरी जाऊन दबाव आणत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. ग्रामीण कुटा फायनान्स, भारत फायनान्स, समस्ता फायनान्स, बीएसएस, एल अँड टी, क्रेडिट ॲक्सेस आणि स्वतंत्र फायनान्स यांसह इतर वित्तीय संस्था, खासगी बँका तसेच खासगी सावकारीच्या माध्यमातून होणाऱ्या वसुली पद्धतींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.


    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांची सक्तीची वसुली थांबवून कर्जदारांना दिलासा द्यावा. कर्जफेडीतील अडचणींमुळे लाभार्थ्यांच्या सीआयबीआयएल (CIBIL) गुणांकनावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी. वसुलीदरम्यान धमकावणे, अपमानास्पद वागणूक देणे किंवा कायद्याविरुद्ध दबाव आणण्याचे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.


    याशिवाय, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध कराव्यात आणि नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. गायरान व वनीकरण जमिनींच्या नोंदींमुळे फार्मर आयडी मिळण्यात अडचणी येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा. गायरान जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील पोटखराब नोंदींची तपासणी करून नियमानुसार आवश्यक दुरुस्ती करावी, जेणेकरून पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज व शासकीय योजनांचा लाभ मिळू शकेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.


     या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, परभणी, पोलीस अधीक्षक, परभणी आणि जिंतूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते शरद सुदामराव चव्हाण यांच्या आयोजनाखाली झालेल्या या आंदोलनात प्रवीण वाकळे, नामदेव तुपसुंदर, राजू गंडले, दर्शन सुरवसे, काशिनाथ भदर्गे, शंकर वाघ, सुशीला सिंनगारे, हौसाबाई चव्हाण, मीरा सुंदर वाकळे, रत्नमाला घोगरे, सीता घोगरे, रेणुका घोगरे, राधा घोगरे आदी सहभागी झाले होते.

 ________________________

0/Post a Comment/Comments