तणावमुक्त जीवनासाठी ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा – मत्स्योदरी विधी महाविद्यालयात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची विद्यार्थी विकास कार्यशाळा उत्साहात!


लोकनेता न्युज नेटवर्क
 

जालना/प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, त्यांच्यात आत्मविश्वास, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा, तसेच शैक्षणिक जीवनातील ताणतणावाचे प्रभावी व्यवस्थापन करता यावे, या उद्देशाने मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय विद्यार्थी विकास कार्यशाळेचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

    विद्यार्थी विकास विभाग आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व मानवतावादी संस्था ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा ‘मेगा हॅपीनेस प्रोग्राम फॉर यूथ’ या संकल्पनेवर आधारित होती. आजच्या स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच मानसिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

    कार्यशाळेत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या मार्गदर्शक तथा प्रशिक्षिका कु. सुरश्री अय्यर यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम, ध्यान आणि सुदर्शन क्रियेचे महत्त्व प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले. कायद्याच्या अभ्यासादरम्यान विद्यार्थ्यांना अनेकदा मानसिक ताण, अभ्यासाचा दबाव आणि भविष्याविषयी चिंता जाणवते. अशा परिस्थितीत नियमित ध्यानधारणा केल्याने मन शांत ठेवण्यास, एकाग्रता वाढविण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

    यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका कु. पलक अग्रवाल, प्रशिक्षक श्री. अरुण मोहता, श्री. राहुल जोशी आणि श्री. संदीप मगर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केवळ पुस्तकी ज्ञान संपादन करून चालत नाही, तर विद्यार्थ्यांनी स्वतःमधील आंतरिक ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करणे आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल राखणारे विद्यार्थीच भविष्यात सक्षम वकील आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजात योगदान देऊ शकतात, असे मत यावेळी मार्गदर्शकांनी व्यक्त केले.

    कार्यशाळेदरम्यान विविध प्रात्यक्षिके, क्रीडा प्रकार आणि गटचर्चांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवित कार्यशाळेला चांगला प्रतिसाद दिला.

 कार्यक्रमाच्या निमंत्रक तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तरन्नूम शेख यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासोबतच त्यांची शैक्षणिक प्रगती तणावमुक्त वातावरणात व्हावी, मानसिक स्वास्थ्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि जीवनकौशल्यांचा विकास व्हावा, या हेतूने या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी विकास अधिकारी तसेच आयोजन समितीचे सदस्य प्रा. गोरे एस. जे., प्रा. पवार आर. पी., प्रा. पटेकर एस. यू. आणि प्रा. शेख एच. एम. यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील विधी शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

    दैनंदिन जीवनातील धावपळ आणि शैक्षणिक जबाबदाऱ्यांमध्ये मनाची शांतता टिकवून ठेवणे, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळविणे आणि सकारात्मकतेने आव्हानांना सामोरे जाणे, याचे उपयुक्त मार्गदर्शन या कार्यशाळेतून मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जोशी व्ही. एस. यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. हंगरगे एस. डी. यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.
________________________

0/Post a Comment/Comments