दुष्काळ दूर होऊ दे, हिंदू संस्कृतीचा जयघोष होऊ दे...ग्रामदैवत तळ्याच्या आई चरणी देशमुख दाम्पत्याची प्रार्थना
लोकनेता न्युज नेटवर्क
रहेरी बु (प्रतिनिधी) / ज्ञानेश्वर तिकटे :- दुसरबीड येथील जागृत ग्रामदैवत आणि पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या श्री जगदंबा देवी (तळ्याची आई) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली.
शिवसेना नेते गजेंद्र देशमुख सपत्नीक सौ. प्रणिता गजेंद्र देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटाची स्थापना व आरती करण्यात आली. यावेळी स्थापनेला पौरोहित्य हरिहर जांभोरकर महाराज यांनी केले.
घटस्थापनेनंतर देशमुख दाम्पत्यांनी आई जगदंबे चरणी प्रार्थना करताना "दुष्काळाची परिस्थिती दूर होऊ दे, दृष्ट व राक्षसी प्रवृत्तीचा नाश होऊ दे, सर्व भक्तांवर कृपा आशीर्वाद राहू दे आणि हिंदू संस्कृती व परंपरेचा जयघोष होऊ दे" अशी आर्त साद घातली.
दुसरबीड व पंचक्रोशीतील नागरिकांची तळ्याची आईवर अपार श्रद्धा आहे. नवसाला पावणारी आई म्हणून या ठिकाणी वर्षभर महिला, पुरुष, तरुण आणि बालगोपाळांची वर्दळ असते. रोज सकाळ-संध्याकाळच्या आरतीला भाविकांची मोठी उपस्थिती असते, तर नवरात्र उत्सवात या गर्दीत प्रचंड वाढ होते. यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
तलावाच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य परिसर, हिरवीगार झाडे-झुडपे, शेजारीच असलेली कैलास टेकडी आणि खंडोबाचे मंदिर यामुळे जगदंबा मंदिराला नैसर्गिक सौंदर्य आणि भक्तीची वेगळीच किनार लाभली आहे. मंदिर व्यवस्थापनाची पारदर्शकता आणि तरुण कार्यकर्त्यांची विनामूल्य सेवा यामुळे भाविकांमध्ये संस्थेबद्दल सकारात्मक भावना आहे.
यावेळी संस्थेचे विश्वस्त रमेश आबा देशमुख, राजेश्वर देशमुख, गजानन महाराज साखरे, योगेश जायभाय,संजय तीपाले, ज्ञानेश्वर केदार, अजय भोसले, कार्तिक सांगळे, दिलीप आतार यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते ________________________

Post a Comment