एटापल्ली वनपरिक्षेत्रात वनजमिनीवरील अतिक्रमण हटवले; वनविभागाने फिरवला जेसीबी


लोकनेता न्युज नेटवर्क 

एटापल्ली :- येणाऱ्या परसलगोंदी उपक्षेत्रातील बांडे नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक २७३३ मधील वनजमिनीवर करण्यात आलेले बेकायदेशीर अतिक्रमण वनविभागाने धडक कारवाई करत हटवले आहे. या कारवाईमुळे वनजमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 
   वनजमिनीचे संरक्षण करणे, वनक्षेत्रातील अतिक्रमण रोखणे तसेच वनसंपत्तीचे संवर्धन व जतन करण्याच्या हेतूने भामरागड वनविभागांतर्गत एटापल्ली वनपरिक्षेत्राच्या वतीने ही विशेष मोहीम राबवण्यात आली. वनजमिनीवर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. वनक्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वनविभाग कटिबद्ध असून यापुढेही वनजमिनीवरील कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमानास प्रतिबंध करण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा वनविभागाच्या वतीने देण्यात आला आहे. 
   सदर धडक कारवाई भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मिना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सहायक वनसंरक्षक डी.जी.रामटेके व एटापल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वात एटापल्ली वनपरिक्षेत्रातील सर्व वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोहीम फत्ते करण्यात आली. ________________________

0/Post a Comment/Comments