विवेकानंद चौक पोलिसांची कारवाई; पिस्तूल व काडतुसाची एकूण किंमत ४० हजार ५०० रुपये
लातूर /जाफर पटेल :- शहरातील माताजी नगर परिसरात बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चरणसिंग बंडुसिंग भाट (वय २४, रा. आनंद नगर, लातूर) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले असून, जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ४० हजार ५०० रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बसवेश्वर चौक ते कव्हा जाणाऱ्या रस्त्यालगत माताजी नगर येथील चौकातील भगव्या झेंड्याजवळ हा प्रकार उघडकीस आला. संबंधित तरुणाकडे कोणताही वैध शस्त्र परवाना नसताना त्याच्या ताब्यात गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ७.६५ एमएम बोअरचे लोखंडी धातूपासून बनविलेले गावठी पिस्तूल असून, त्याच्या मुठीच्या दोन्ही बाजूंना काळ्या रंगाची प्लास्टिकची ग्रिप आहे. या पिस्तुलाची अंदाजे किंमत ४० हजार रुपये, तर जिवंत काडतुसाची किंमत ५०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार गणेश आनंद यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे १.०५ वाजता विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४१/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियमाचे कलम ३(१)/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अरविंद संभाजी पवार यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. बी. आंधळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.________________________

Post a Comment