जालना जिल्ह्यात २७ ऑक्टोबरला आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता मोहीम; जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यदायी वातावरणावर विशेष भर
जालना/प्रतिनिधी :- स्वच्छ रुग्णालय म्हणजे सुरक्षित आरोग्यसेवेचा पाया, हा संदेश देत केंद्र शासनाच्या ‘कायाकल्प’ उपक्रमांतर्गत जालना जिल्ह्यात मंगळवारी दि २७ रोजी एकदिवसीय स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना तसेच संलग्न उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आयोजित या मोहिमेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून स्वच्छतेप्रति आपली बांधिलकी व्यक्त केली. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन करत आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्याचे आवाहन केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या आदेशानुसार या अभियानाचे आयोजन करण्यात आले. नोडल अधिकारी डॉ. प्रकाश पाटोदेकर यांच्यासह अधिपरिचारिका, परिचारिका आणि विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवणे, आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे आणि स्वच्छतेविषयी कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता वाढविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
अभियानादरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी अध्यक्षीय भाषणातून सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. रुग्णालय परिसराची नियमित स्वच्छता, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पर्यावरणाची निगा आणि जैववैद्यकीय कचऱ्याची नियमानुसार विल्हेवाट या विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
रुग्णालयांमध्ये स्वच्छता राखणे ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य भाग असली पाहिजे. रुग्णांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छतेसोबतच आरोग्यसंपदेचे जतन आणि पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य संस्थांमध्ये निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सुरक्षित हाताळणी आणि नियमानुसार विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संबंधित नियमांचे पालन करून रुग्णालय परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांच्या श्रमदानातून स्वच्छतेचे महत्त्व आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.
स्वच्छ रुग्णालय, सुरक्षित उपचार आणि निरोगी समाज या संकल्पनेला बळ देण्यासाठी स्वच्छता अभियान सातत्याने राबविणे आवश्यक आहे. ‘कायाकल्प’ उपक्रमाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि योग्य कचरा व्यवस्थापनाबाबत सकारात्मक जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.________________________

Post a Comment