दुष्काळ अनुदानापासून गायरानधारक शेतकरी वंचित



‘फार्मर आयडी’च्या अटीमुळे मदतीचा मार्ग बंद; भीमप्रहारचा आंदोलनाचा इशारा

लोकनेता न्युजनेटवर्क 

परभणी :- 
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अग्रिम स्वरूपात पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू असताना गायरानधारक शेतकरी मात्र या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातबारा उताऱ्यावरील ‘पोटखराब’ नोंदीमुळे फार्मर आयडी मिळविण्यात अडचणी येत असल्याने या शेतकऱ्यांसमोर अनुदानाचा लाभ मिळविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या तांत्रिक अडचणीवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी भीमप्रहार संघटनेने केली आहे.

   राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. पिकांचे नुकसान, उत्पन्नातील घट आणि वाढता आर्थिक भार यामुळे शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची गरज असताना गायरानधारक शेतकऱ्यांना फार्मर आयडीच्या अटीमुळे अनुदान मिळविण्यात अडथळे येत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

  गायरान जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शासनाकडून पूर्वीपासूनच ‘पोटखराब’ अशी नोंद असल्याने अनेकांना फार्मर आयडी मिळालेला नाही. परिणामी, अनुदानासाठी आवश्यक असलेली ही अट पूर्ण करण्यात त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे दुष्काळाचा फटका बसूनही शासकीय मदतीपासून दूर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

गायरानधारकांनाही मदतीचा लाभ द्या


गायरानधारक शेतकरीही दुष्काळाच्या झळा सोसत असून त्यांनाही आर्थिक मदतीची गरज आहे. केवळ फार्मर आयडी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अनुदानापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची भूमिका भीमप्रहार संघटनेने मांडली आहे. शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन फार्मर आयडीच्या अटीमुळे निर्माण झालेली अडचण दूर करावी आणि पात्र गायरानधारक शेतकऱ्यांनाही दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

अन्यथा परभणी जिल्ह्यात आंदोलन

गायरानधारक शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा भीमप्रहार संघटनेच्या वतीने परभणी जिल्ह्यात व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण कनकुटे यांनी दिला आहे.
________________________

0/Post a Comment/Comments