जिंतुरची ग्रामीण एसटी सेवा दहा दिवसांपासून बंद

 

लांब पल्ल्यांच्या गाड्या मात्र सुसाट


_जिंतूर आगाराच्या नियोजन शून्य कारभारावर विद्यार्थी, महिला, कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया_

लोकनेता न्युजनेटवर्क 

जिंतूर: रत्नदीप शेजावळे :- आगार प्रमुखांच्या ढिसाळ, विस्कळीत आणि जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नियोजनाचा फटका तालुक्यातील ग्रामीण जनतेला बसत आहे. बामणी, कोठा, सायखेडा, आडगाव, गडद, गव्हाण, वझर, सावरगाव, कवडा, धानोरा, हलवीरा, पिंपरी, ब्राह्मणगाव, येलदरी आणि दिग्रस या गावांतील नियमित एसटी फेऱ्या गेल्या दहा दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रोजीरोटीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. ग्रामीण जनतेच्या मूलभूत प्रवासाच्या हक्काकडे आगार प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
   ग्रामीण भागातील अत्यावश्यक फेऱ्या बंद ठेवून जिंतूर आगारातून लांब पल्ल्यांच्या मार्गांवरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. जिंतूर-पुणे तीन, जिंतूर-सातारा दोन, जिंतूर-सोलापूर दोन, परभणी-अमळनेर दोन आणि परभणी-संभाजीनगर तीन अशा लांब पल्ल्याच्या गाड्या दररोज धावत आहेत. त्याचवेळी जिंतूर-अकोला आणि जिंतूर-लातूर या फेऱ्याही बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण प्रवाशांना वाऱ्यावर सोडून लांब पल्ल्याच्या सेवांना प्राधान्य देण्यामागे नेमके कोणते धोरण आहे? आगार प्रशासनाला ग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षण, कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ आणि नागरिकांची रोजची गरज यापेक्षा लांब पल्ल्याच्या फेऱ्याच महत्त्वाच्या वाटतात का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
   जिंतूर आगारात एकूण ६० बसगाड्या असून त्यापैकी नऊ बसगाड्या नादुरुस्त असल्याची माहिती आहे. उर्वरित ५१ गाड्यांमध्ये मानव विकास कार्यक्रमासाठी १४, मुक्कामी १२ आणि स्लीपर कोचच्या पाच गाड्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नियमित फेऱ्यांसाठी उपलब्ध गाड्यांवर मोठा ताण येत असल्याचे चित्र आहे. मात्र उपलब्ध वाहनांचे पारदर्शक, गरजाधारित आणि जबाबदार नियोजन करण्याऐवजी ग्रामीण फेऱ्या बंद ठेवणे हा आगार प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा स्पष्ट नमुना असल्याची टीका होत आहे. दहा दिवसांपासून सेवा बंद असताना पर्यायी व्यवस्था का उभी करण्यात आली नाही, याचे उत्तर आगार प्रशासनाने जनतेला द्यावे, अशी मागणी होत आहे.
   ग्रामीण एसटी सेवा खंडित झाल्याने अनेक गावांतील नागरिकांना महागड्या खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. खराब रस्त्यांच्या परिस्थितीत खासगी प्रवासी वाहतुकीचा वाढता वापर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयीन वेळा, कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ आणि महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन प्रवास यावर या फेऱ्या बंदीचा थेट परिणाम होत आहे. दहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे आगार प्रमुखांच्या कार्यक्षमतेवरच नव्हे, तर संपूर्ण नियोजन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून प्रशासन नेमके कोणाची जबाबदारी पार पाडत आहे, असा सवालही उपस्थित होत आहे.
   येत्या काळात सण-उत्सवांची लगबग सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था तातडीने सुरळीत करणे आवश्यक आहे. बंद करण्यात आलेल्या सर्व ग्रामीण फेऱ्या त्वरित पूर्ववत कराव्यात, उपलब्ध बसगाड्यांचे मार्गनिहाय नियोजन जाहीर करावे आणि नादुरुस्त गाड्या तातडीने दुरुस्त करून सेवेत आणाव्यात, अशी मागणी होत आहे. ग्रामीण प्रवाशांची गैरसोय होत असून याबाबत जिंतूर आगार प्रमुखांना पत्रव्यवहार केला असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सौ. रोहिणी वटाणे यांनी सांगितले आहे. आता केवळ पत्रव्यवहार नको, तर आगार प्रशासनाने तातडीने कृती करून त्याचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


"ग्रामीण भागासाठी एसटी हाच एकमेव आधार"


वझर, सायखेडा आणि कवडा हा तालुक्यातील दुर्गम भाग असून या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी बससेवा हा प्रवासाचा प्रमुख आणि अनेकदा एकमेव पर्याय आहे. नियमित सुरू असलेली वाहतूक अचानक बंद करून ग्रामीण जनतेला खासगी वाहनांच्या भरवशावर सोडणे हा अन्यायकारक आणि असंवेदनशील प्रकार आहे. गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेल्या फेऱ्या तातडीने सुरू करण्याबाबत आगार प्रमुखांना पत्र दिले आहे. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवरही बससेवा पूर्ववत न झाल्यास आगार प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा जि.प. सदस्या सौ. रोहिणी वटाणे यांनी दिला.

________________________

0/Post a Comment/Comments