जिंतूरात काँग्रेसचे धरणे आंदोलन; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांच्या मदतीची मागणी



निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी    



लोकनेता न्युज नेटवर्क

जिंतूर : रत्नदीप शेजावळे :- परभणी जिल्ह्यासह जिंतूर तालुक्यात यंदा १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, तसेच निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. १५) जिंतूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. संकटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. विविध मागण्यांच्या समर्थनार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यासह अन्य मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. तसेच निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली.

आंदोलनानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.________________________

0/Post a Comment/Comments