पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा!



हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या; अन्यथा आंदोलन अटळ, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

लोकनेता न्युज नेटवर्क
 

बुलढाणा/प्रतिनिधी :- खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देण्याच्या घोषणेवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतीसाठी लाखो रुपये खर्च करायचे आणि नुकसान झाल्यानंतर मदत मात्र पाच हजार रुपये मिळणार, हा कुठला न्याय? असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे; अन्यथा गावागावांतून शेतकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन उभारतील, असा इशाराही त्यांनी दिला.

‘आम्हाला भिकारी समजता का? आम्ही पेरा केला नाही, तर तुम्ही काय खाणार धतुरा?’ असा सवाल करत तुपकर यांनी सरकारच्या मदतीच्या घोषणेवर टीका केली. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टातून जनतेच्या ताटात अन्न पोहोचते. मात्र, शेतकरी संकटात असताना त्याला सन्मानाने उभे करण्याऐवजी तुटपुंजी मदत जाहीर करणे म्हणजे त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले.

शेतीच्या मशागतीपासून बियाणे, खते, कीटकनाशके, फवारणी आणि मजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला मोठा खर्च करावा लागतो. अनेक शेतकरी कर्ज काढून पेरणी करतात. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि पुढील हंगामाची तयारी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. दिवाळीचा सण जवळ आला असताना शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

‘पाच हजार रुपये आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही आमच्याकडे या, वर्षभर राहून दाखवा आणि याच पैशांत संसार चालवून दिवाळी साजरी करून दाखवा. मग कळेल शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत!’ अशा शब्दांत तुपकर यांनी सरकारला सुनावले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करून हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी आणि मदत देताना प्रत्यक्ष नुकसान व शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारने शेतकऱ्यांना गृहीत धरू नये. पाच हजार रुपयांची मदत पुरेशी नसून शेतकऱ्यांना न्याय्य नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. मागणीचा गांभीर्याने विचार न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. त्यामुळे हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाईच्या मागणीवर सरकार काय निर्णय घेते आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष दिलासा मिळतो का, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.________________________

0/Post a Comment/Comments