ठाणेदार निलेश शेंबडे यांची तत्पर दखल; कापूस चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव



डोंगरगावात घराच्या आवारातील बाथरूममधून क्विंटलभर कापूस लंपास; शेतकऱ्याचे १० हजारांचे नुकसान, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू


लोकनेता न्यूज नेटवर्क

महागाव / सय्यद मुदस्सीर :- महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे शेतकरी सय्यद मुसवीर. सय्यद जमील घराच्या आवारातील बाथरूममध्ये ठेवलेला अंदाजे एक क्विंटल कापूस अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. ऐन कापूस हंगामात घडलेल्या या चोरीमुळे गावात खळबळ उडाली असून, शेतकऱ्याचे अंदाजे १० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोफाळीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार निलेश शेंबडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली.
मक्त्याच्या शेतातील कापसावर चोरट्याचा डल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरगाव येथील सैयद मुसवीर सैयद जमील यांनी गावातील सुनील माणिकराव कदम यांचे अडीच एकर शेत मक्त्याने केले होते. या शेतात हळद, सोयाबीन, कापूस आणि तुरीचे पीक घेतले होते. मुसवीर हे सध्या वर्धा येथील कारागृहात असल्याने त्यांच्या शेतीची जबाबदारी वडील सैयद जमील सैयद हकीम सांभाळत आहेत. शेतातील कापूस वेचून घराच्या आवारातील बाथरूममध्ये ठेवण्यात आला होता.
भिंतीवरून उडी मारून चोरट्याचे पलायन
१ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता कुटुंबीय जेवण करून झोपले होते. दरम्यान, २ नोव्हेंबरच्या पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास काळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट परिधान केलेला एक इसम घराच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाताना दिसल्याची माहिती सैयद मोहसीन याने दिली. त्यानंतर पाहणी केली असता बाथरूममध्ये ठेवलेला अंदाजे एक क्विंटल कापूस गायब असल्याचे आढळले. सुमारे दहा हजार रुपये किमतीचा हा कापूस अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ठाणेदार शेंबडे यांची तत्परता; घटनास्थळी तातडीने भेट
चोरीची माहिती मिळताच पोफाळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश शेंबडे यांनी वेळ न दवडता सकाळीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरगाव बीटचे जमादार दादाराव चिल्लोहरकर पुढील तपास करीत आहेत. ठाणेदारांनी दाखविलेल्या या तत्परतेचे कौतुक होत असून, चोरीचा छडा लावण्याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
चोरीचा तपास : सीसीटीव्ही व तांत्रिक पुराव्यांकडे लक्ष
चोरट्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्यास त्यांची तपासणी, घटनास्थळावरील ठसे आणि इतर तांत्रिक पुराव्यांची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. या दिशेने तपास केल्यास चोरट्यापर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. चोरीला गेलेला कापूस हस्तगत करून आरोपीला शोधण्याचे आव्हान पोफाळी पोलिसांसमोर आहे.
शेती संकटात; त्यात चोरीचे नवे संकट
आधीच शेतीमालाला योग्य भाव मिळण्याची चिंता, पावसाच्या अनिश्चिततेमुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी आणि उत्पादन खर्चाचा वाढता भार यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत कष्टाने पिकविलेला कापूस घराच्या आवारातूनच चोरीला जाणे ही शेतकरी कुटुंबासाठी मोठी आर्थिक व मानसिक धक्का देणारी बाब आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून चोरीला गेलेला कापूस हस्तगत करावा आणि अज्ञात चोरट्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गुन्हा दाखल : सैयद जमील सैयद हकीम यांच्या जबानी तक्रारीवरून पोफाळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ व ३३१(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 नागरिकांकडून ठाणेदारांच्या तत्परतेचे कौतुक
पोफाळीचे ठाणेदार निलेश शेंबडे यांनी घटनेची माहिती मिळताच सकाळीच घटनास्थळी धाव घेऊन तातडीने दखल घेतली. त्यांच्या या कर्तव्यदक्ष भूमिकेचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दादाराव चिल्लोहरकर तपास करीत असून, चोरट्याचा लवकरच शोध लागेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

दुष्काळाच्या सावटात शेतकरी; त्यात कापूस चोरीचे दुहेरी संकट
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांचा दुष्काळाच्या ट्रिगर-१ श्रेणीत समावेश झाल्याने महागाव तालुक्यातील शेतकरीही संकटाच्या छायेत आहेत. आधीच पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेती व्यवसाय अडचणीत असताना कष्टाने पिकविलेला कापूस घराच्या आवारातून चोरीला जाणे ही शेतकरी कुटुंबासाठी मोठी आर्थिक हानी आहे. निसर्गाच्या संकटासोबत आता चोरीच्या घटनांमुळेही शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
डोंगरगाव येथे सामाजिक कार्यकर्ता सय्यद मुदस्सीर
________________________

0/Post a Comment/Comments